
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदासंघात कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार असल्याचे संकेत इगतपुरीचे माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांनी दिले आहेत. काही वेळापूर्वी त्यांच्याशी संपर्क झाला असता त्यांनी ही निवडणूक माझ्यासाठी आणि कार्यकर्त्यांसाठी अतिशय प्रतिष्ठेची असून “अभी नहीं तो कभी नहीं” अशी समर्थकांची भूमिका आहे. सर्वांच्या विचारांचा सन्मान करून उद्या सर्वांसोबत विचारविनिमय करणार आहे. पुढील राजकीय दिशा ठरवून जोमाने विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याचा अंतिम निर्णय घेण्यात येईल. मतदारसघात अतिशय अनुकूल वातावरण, कार्यकर्त्यांची अभेद्य फळी, लोकांचा आशीर्वाद आणि कामांचे फळ या जोरावर निवडणूक मी लढवणार आहे. यासाठी उद्या सर्वांशी चर्चा आणि बैठका घेऊन निवडणूक लढवण्याचे घोषित करील असे काशिनाथ मेंगाळ म्हणाले आहेत. दरम्यान मतदारसंघातील कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे कळवण्यात आल्याचे समजते. त्यानुसार नियोजन सुद्धा करण्याचे ठरवण्यात आले आहे. दरम्यान इंदिरा काँग्रेसतर्फे काशिनाथ मेंगाळ यांना दिल्लीत तातडीने बोलावून घेण्यात आल्याचे कळते. त्यानुसार उद्याच सर्वानुमते निर्णय घेऊन कोणातर्फे उमेदवारी करायची याबाबत महत्वाची घोषणा होणे अपेक्षित आहे. काँग्रेस कार्यकर्ते आणि इच्छुक व्यक्तींमध्ये या बातमीने चर्चेला उधाण आले आहे.
माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांनी पुढे सांगितले की, स्वतःचा ठाकूर समाज, अन्य आदिवासी समाज आणि मराठा समाजासह अन्य सगळे समाज माझ्या सोबत राहून मला विधानसभेत पाठवण्यासाठी सज्ज झाले आहेत. गेली १५ वर्ष हा मतदारसंघ विकासापासून मागे असून हा अनुशेष भरून काढावा असा माझ्या तमाम माता भगिनी आणि बांधवांचा हट्ट आहे. म्हणूनच कोणत्याही परिस्थिती आली तरी यंदाची निवडणूक लढवून विधानसभेत आमदार म्हणून जायचेच हे मला सर्वांनी सांगितलेले आहे. या अनुषंगाने उद्या सर्व कार्यकर्ते, समर्थक, हितचिंतक, सर्व समाजाचे प्रमुख पदाधिकारी यांच्या सोबत मी मुक्त संवाद साधणार आहे. यामध्ये निवडणुकीसाठी ताकदीने सज्ज होऊन पुढील नियोजन आणि दिशा निश्चित केली जाईल. कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याबाबत आधीच सांगण्यात आले आहे म्हणून जोरदार पूर्वतयारी करण्यात आली आहे असेही त्यांनी सांगितले. काशिनाथ मेंगाळ यांच्या उमेदवारीमुळे इगतपुरी विधानसभेची समीकरणे बदलणार आहेत.