भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – स्वतंत्र मतदारसंघाची आवश्यकता असताना प्रत्यक्षात त्र्यंबकेश्वर १९६२ पर्यंत नाशिक मतदारसंघात समाविष्ट होते. १९६२ च्या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान त्र्यंबकेश्वरचा समावेश इगतपुरी मतदारसंघात झाला. मतदारसंघाचे स्वतंत्र अस्तित्व नसल्यामुळे त्र्यंबकेश्वरची सातत्याने उपेक्षा झाल्याची लोकभावना आहे. आजवर या भागातील एकाही स्थानिक व्यक्तीला कोणत्याच पक्षाने निवडणूक लढविण्याची संधी दिलेली नाही. १९६२ पासून मतदारसंघावर काँग्रेसचे प्रभुत्व राहिले. हा मतदारसंघ १९६३ पासून ते १९८५ पावेतो तब्बल २२ वर्षे काँग्रेसचा बालेकिल्ला ओळखला जात असे. जनता पार्टीच्या लाटेत १९९० मध्ये यादवराव बांबळे भाजपाच्या तिकिटावर निवडून आले. तेव्हापासून त्र्यंबकेश्वरमधेही स्थित्यंतर घडून भाजपा, शिवसेना युती प्रबळ झाली. १९९९ व २००४ च्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुहीचा फायदा युतीच्या उमेदवाराला झाला. १९९९ मध्ये पांडुरंग गांगड यांना त्र्यंबकमधून मताधिक्य मिळाले असले तरी २००४ च्या निवडणुकीत मेंगाळांना मात्र त्र्यंबकमधून कमी मते पडली. २००९ आणि २०१४ मध्ये निर्मला गावित यांनाही त्र्यंबक तालुक्याने जास्त मतदान केले. २०१९ ला हिरामण खोसकर यांनीही येथूनच चांगली आघाडी घेतली. त्र्यंबकेश्वर तालुक्याची निर्मिती झाल्यानंतर त्र्यंबक तालुका तीन मतदारसंघात विभागला गेला होता. यापूर्वी १२४ गावांच्या या तालुक्यातील ५८ गावे पेठ मतदारसंघाला, तीन गावे दिंडोरीला, तर ६४ गावे इगतपुरी मतदारसंघाला जोडलेली होती. मतदारसंघ पुनर्रचनेत मात्र संपूर्ण पेठ तालुक्यातील गावे (जी आता त्र्यंबकेश्वर तालुक्यात आहेत) इगतपुरीला जोडण्यात आली. पर्यायाने इगतपुरी मतदारसंघात आज त्र्यंबकेश्वर तालुका पूर्णपणे सामील झाला असून, या मतदारसंघावर त्र्यंबकेश्वरचे वर्चस्व स्थापित झाले आहे. त्यामुळे येथील मतदारांच्या भूमिकेला बरेच महत्त्व आहे. इगतपुरी मतदारसंघ धरणांचे माहेरघर, मंदिर, सिंहस्थ कुंभेमळ्यात स्नानाचे महत्त्व असलेला ओळखला जातो. मुंबईला पिण्याचे पाणी पुरविणारा. तीर्थराज कुशावर्त, संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज संजीवन समाधी, आणि मराठवाड्यातील शेती हिरवीगार करणारा हा मतदारसंघ मात्र कायमचा मागासलेलाच राहिला आहे. तांदळामुळे प्रसिद्ध घोटी शहर, मध्य रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे स्थानक, आध्यात्मिक क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विपश्यना केंद्र याच मतदारसंघातील. याशिवाय श्री ज्योतिर्लिंग, त्र्यंबकेश्वर गंगा गोदावरीचे उगमस्थान ब्रह्मगिरी, पेशव्यांनी बांधलेले त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर, श्री स्वामी समर्थ मंदिर व गुरुकुल प्रकल्प, सिंहस्थ शाहीस्नानाचे दहा आखाडे व साधुंचे वास्तव्य. अशा धार्मिक क्षेत्रांमुळे प्रख्यात असलेले त्र्यंबक हा या मतदारसंघात महत्त्वाचा भाग आहे.
पुनर्रचनेनंतर अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या इगतपुरी विधानसभा मतदारसंघात त्र्यंबक, हरसूल, सुरगाणाकडील काही भाग समाविष्ट आहे. इगतपुरी तालुक्यातील खेड गटातील ३३ गावे सिन्नर मतदारसंघात आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पक्षीय बलाबल जितके महत्त्वपूर्ण ठरणार आहे, तितकेच तालुक्याची अस्मिता या मुद्यावर त्र्यंबक आणि इगतपुरी येथील मतदारांचा संघर्षही लक्षणीय ठरतो. धरणाचे पाणी, संपादित जमिनी, औद्योगिकरण, बेरोजगारी, पर्यटन, पर्यावरणाचा प्रश्न आदी महत्वाचे मुद्दे या मतदारसंघात जाणीवपूर्वक रखडविण्यात आले आहेत. याच मुद्यांचे भांडवल वापरून दरवेळी निवडणूक लढविण्यात येते. इगतपुरी विधानसभा मतदारसंघ बराच काळ डहाणू लोकसभेशी जोडलेला होता. त्यामुळे खासदार व आमदार दोन्ही राखीव प्रवर्गातील असत. खासदार ठाणे जिल्ह्यातला असल्याने तो या भागाकडे फक्त निवडणुकीपुरता उगवत असे. त्यामुळे खासदाराकडून होणारी उपेक्षा चर्चेचा विषय ठरे. मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर विधानसभा मतदारसंघ नाशिक लोकसभेला जोडला गेला. खुल्या मतदारसंघामुळे या तालुक्यातील राजकीय हवामान पूर्ण बदलून आहे. सर्वाधिक पावसाची नोंद असलेला इगतपुरी त्र्यंबक तालुका पाण्याच्या प्रश्नावर नेहमी मागास राहिला आहे. मुंबईकरांना पिण्याचे पाणी पुरविणारा वैतरणा प्रकल्प तालुक्यातच आहे; परंतु स्थानिक जनतेला त्याचा उपयोग नाही. समृद्धी महामार्ग, दारणा, मुकणे, कडवा, भाम, भावली धरण बघता तालुक्याचा अधिकांश भाग पाण्याखाली गेलेला आहे. परंतु शेतीला पाणी नाही. प्रकल्पग्रस्तांना नोकरी नाही. कोणताही विशेष लाभ नाही. अनेक मोठ्या नामांकित कंपन्या तालुक्यात आल्या खऱ्या; परंतु स्थानिक तरुणाला कायमस्वरूपी रोजगार मिळाला नाही. शैक्षणिक आघाडीवर तालुका मागास राहिला आहे. येथे मेडिकल, इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट महविद्यालये होण्याची गरज आहे.राखीव मतदारसंघ असल्याने आदिवासी समाजातून उमेदवार पुढे करून राजकारण करणाऱ्या नेत्यांची परंपरा इगतपुरी विधानसभा क्षेत्राला आहे. कै. मूळचंद गोठी प्रारंभी स्वतः आमदार होते. जागा राखीव झाल्यानंतर त्यांनी राजकीय ‘किंगमेकर’ची भूमिका नेहमी बजावली. भाऊ सक्रू वाघ, शिवराम झोले, यादवराव बांबळे यांच्या विजयात गोठींची भूमिका निर्णायक होती. त्या तुलनेत गोपाळराव गुळवे यांनी नेहमीच हातचे राखीत अपक्षांची पाठराखण केली आहे. कधी विठ्ठलराव घारे कधी यादवराव बांबळे तर कधी शिवराम झोले अपक्ष उमेदवार असताना गुळवे यांनी त्यांची पाठराखण केली होती. त्यांच्यामुळेच निर्मला गावित यांना आमदारकी मिळू शकली होती.
ऐन निवडणुकीच्या तोंडाशी मूळ पक्षाशी फारकत घेऊन नशीब अजमाविणाऱ्यांची इगतपुरीकरांनी नेहमीच पाठराखण केल्याचे दिसून येते. १९८५ साली शिवराम झोले भाजपा सोडून अर्स काँग्रेसमध्ये गेले आणि पुलोदचे आमदार म्हणून विजय प्राप्त केला. १९९० साली यादवराव बांबळे काँग्रेस सोडून भाजपात आले आणि युतीचे आमदार झाले. भाजपाला रामराम ठोकून अर्स कॉंग्रेसमध्ये गेलेले झोले १९९५ मध्ये हा पक्षच काँग्रेसमध्ये विलीन झाल्यामुळे काँग्रेसवासी झाले आणि निवडूनही आले. विशेष म्हणजे यावेळी त्यांना शेकापच्या ज्या पांडुरंग गांगड यांनी लढत दिली होती ते गांगड १९९९ साली शिवसेनेत दाखल झाले आणि त्यांनी विजय प्राप्त केला. गांगड यांच्या विरोधात असलेले काशीनाथ मेंगाळ त्यावेळी डाव्या आघाडीचे उमेदवार होते. २००४ साली मेंगाळ यांनी शिवसेनेशी घरोबा करीत आमदारकी मिळवली. २००९ मध्ये मनसेतर्फे उमेदवारी करून त्यांचा निसटता पराभव झाला. २०१४ मध्ये शिवराम झोले हे शिवसेनेतर्फे उमेदवार होते तेही पराभूत झाले. २०१९ ला निर्मला गावित काँग्रेस सोडून गेल्याने राष्ट्रवादीतुन हिरामण खोसकर काँग्रेसमध्ये आले. त्यांचा विजय आणि शिवसेनेच्या निर्मला गावित यांचा पराभव झाला. इगतपुरी विधानसभा मतदारसंघात नेहमीच कमनशिबी ठरलेल्या व कायम दुसऱ्या स्थानावर राहिलेल्या डामसे घराण्याची वेगळीच शोकांतिका आहे. कै. मूळचंद गोठी यांनी माधवराव डामसे यांना पाठिंबा दिला होता. १९७८ व ८० व ९० या तिन्ही निवडणुकीत त्यांना विजय मिळला नाही. ९९ व २००४ मध्ये त्यांचे सुपुत्र वसंतराव डामसे काँग्रेसचे उमेदवार होते. ९९ साली त्यांच्या पाठीशी गोपाळराव गुळवे होते, तर २००४ साली गुळवे यांनी त्यांची साथ सोडली होती; मात्र या दोन्ही वेळेस वसंतराव डामसे यांचा पराभव झाला आणि नेहमीप्रमाणे दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. सध्या यांच्यापैकी कोणीही निवडणुकीच्या स्पर्धेत नाही. ( समाप्त )