इगतपुरीनामा न्यूज – अठरा विश्व दारिद्र्याशी झुंजतांना थोड्याफार शिक्षणाच्या आणि जिद्धीच्या बळावर कुटुंबाला पुढे नेण्यासाठी एक नवतरुण युवक अंबड एमआयडीसी मधील एका कंपनीत काम करतो. इगतपुरी तालुक्याच्या अतिदुर्गम भागातून कंपनीपर्यंत जवळपास ७० किमीचे मोठे अंतर आहे. घरापासून कंपनीपर्यंत मिळेल त्या वाहनाने कुटुंबाला पुढे नेण्यासाठी तो प्रयत्न करीत होता. काही महिन्याच्या पगारातील बचतीचे पैसे आणि आईकडील किरकोळ सोने विकून त्याने कामावर जाण्यासाठी एक मोटारसायकल विकत घेतली. नव्या उमेदीने हा युवक कामावर जाऊ येऊ लागला. सगळे कुटुंबीय त्याच्यावर अतिशय खूष झालेले होते. अशातच एक दिवस त्याच्या घरापुढे लावलेली त्याची लाडकी मोटारसायकल रात्रीतून चोरीला गेल्याची घटना घडली. डोळ्यांतून अश्रूच्या धारा वाहत वाहत त्याने आसपास बराच शोध घेतला पण त्यात यश आले नाही. अखेर घोटी पोलीस ठाणे गाठून त्याने मोटारसायकल चोरीची फिर्याद दाखल केली. पोलिसांनी सुद्धा त्याला मदत करण्यासाठी निरंतर प्रयत्न केले पण शोध लागला नाही. अखेर ह्या युवकाने मित्रांच्या मदतीने इगतपुरी तालुक्यातील अनेक पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून शोध लावण्यासाठी अखंड प्रयत्न केले. अखेर आपल्याला मोटारसायकल मिळणार नाही असे समजून तो पुन्हा मिळेल त्या वाहनाने आपल्या रोजच्या कामावर जायला लागला. अपार कष्ट करून घेतलेली मोटारसायकल मात्र त्याच्या डोळ्यासमोरून जातच नव्हती…! अनेक कुटुंबामध्ये माझ्यासारख्या अनेक युवकांचे स्वप्न भंग करणाऱ्या चोरट्यांना अद्धल घडावी अशी त्याने अपेक्षा ठेवली होती.
मोटारसायकल चोऱ्या वाढल्याने नाशिकचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी विशेष लक्ष घातले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, घोटीचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील, स्थागुशाचे सपोनि गणेश शिंदे यांनी आपल्या पथकासह सर्वांगीण बाजूने तपासाचे काम सूक्ष्मपणे सुरु केले होते. त्यानुसार ह्या सर्वांनी सामूहिक कौशल्य पणाला लावत नुकतेच मोटारसायकली चोरणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला. जवळपास चोरी झालेल्या २० मोटारसायकली जप्त करून संशयित ४ आरोपी अटक केले. अजूनही अनेक चोरीचे गुन्हे यथावकाश उघड होणारच आहेत. पोलिसांनी चोरट्यांचा शोध लावल्यानंतर ज्याच्या मोटारसायकली चोरी झाल्या अशा व्यक्तींना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. त्यामध्ये इगतपुरी तालुक्याच्या दुर्गम भागातील कष्टकरी युवकाला सुद्धा बोलावले गेले. पोलीस ठाण्यात आल्यावर त्याने आपल्या घामातून घेतलेली मोटारसायकल पाहिली अन त्याच्या डोळ्यातून गंगा यमुना वाहायला लागल्या. बराच वेळ हुंदके देणाऱ्या ह्या युवकाला पोलिसांनी दिलासा देऊन शांत केले. त्याच्या कुटुंबाला सुद्धा मोटारसायकल परत मिळणार असल्याचा आनंद झाला. पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, घोटीचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील, स्थागुशाचे सपोनि गणेश शिंदे, पोकॉ विनोद टिळे, प्रकाश कासार, संदिप झाल्टे, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, पोहवा लक्ष्मण धकाते, योगेश यंदे ह्या सगळ्या व्यक्तींचे त्याने हृदयातुन ऋण व्यक्त केले. ( संबंधित युवकाने त्याचे नाव टाकू नये अशी विनंती केल्याने नाव बातमीत नाही. )