मोटरसायकल चोरी करणारे ४ आरोपी ग्रामीण एलसीबीच्या जाळ्यात : इगतपुरी तालुक्यासह अन्य भागातील ९ गुन्हे उघडकीस ; २० मोटारसायकली जप्त

इगतपुरीनामा न्यूज – नाशिक जिल्ह्यातील मोटरसायकल चोरीच्या वाढत्या गुन्ह्यांना प्रतिबंध होण्यासाठी पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी आढावा घेवून कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांच्या पथकाने जिल्ह्यातील अतिदुर्गम भागांमध्ये मोटर सायकल चोरी करणाऱ्या आरोपींना ताब्यात घेवुन कारवाई केली आहे. नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आंतर जिल्ह्यामध्ये मोटरसायकल चोरी करणारे आरोपीचे रॅकेट उघडकीस आणून कारवाई केली असून ह्या आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, घोटीचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील, स्थागुशाचे सपोनि गणेश शिंदे, पोकों विनोद टिळे, प्रकाश कासार, संदिप झाल्टे, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, पोहवा लक्ष्मण धकाते, योगेश यंदे यांच्या पथकाने मोटरसायकल चोरीचे ९ गुन्हे उघडकीस आणुन कामगिरी केली आहे. आरोपींच्या कब्जातुन चोरीच्या १४ लाख २५ हजार किमतीच्या २० मोटरसायकल हस्तगत केल्या आहे. ४ आरोपींना घोटीत दाखल झालेल्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. 

१८ जुनला घोटी पोलीस ठाणे हद्दीतील अंबुचीवाडी परिसरातुन दोन मोटरसायकल चोरी गेल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. ह्या गुन्ह्याच्या समांतर तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील प्रकाश कासार यांना मिळालेल्या गुप्त माहितीचे आधारे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळुंज एमआयडीसी परिसरातुन आरोपी पृथ्वीराज भोलेश्वर जंगम, वय १९, रा. घोटी, ता. इगतपुरी यास ताब्यात घेवुन ह्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. ह्या आरोपीने त्याच्या साथीदारांसह हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. त्याच्या कब्जातुन चोरीच्या ॲक्सेस मोपेड व टीव्हीएस स्टार या मोटरसायकल हस्तगत करण्यात आल्या आहे. ह्या आरोपीला विश्वासात घेवून अधिक चौकशी केल्यावर त्याने त्याच्या साथीदारांसह आणखी मोटरसायकली चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी ह्या गुन्ह्याच्या समांतर तपासात आरोपी राजेश दगड्डु मोहरे, वय २५, रा. फुलवडे, ता. आंबेगाव, जि. पुणे सध्या राहणार म्हाळुंगे एमआयडीसी, जि. पुणे यास रात्रभर पाळत ठेवून शिताफीने ताब्यात घेतले आहे. यातील ताब्यात घेतलेले दोन्ही आरोपी पृथ्वीराज जंगम व राजेश मोहरे यांनी त्यांचे आणखी विधीसंघर्षित दोन साथीदार यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील घोटी, इगतपुरी, वाडीवऱ्हे, सिन्नर, ठाणे जिल्ह्यातील शहापुर, खडकपाडा, आणि पुणे जिल्ह्यातील आंबेठाण, म्हाळुंगे एमआयडीसी, आळेफाटा, मंचर या ठिकाणांवरून महागड्या मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली आहे. ह्या आरोपींनी कबुली दिल्यावरून मोटरसायकल चोरीचे ९ गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.

Similar Posts

error: Content is protected !!