प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील पाडळी देशमुख भागात तब्बल ४ बिबट्यांचा मुक्त संचार वाढल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमधुन होत आहे. वनविभाग मात्र सुस्तावले असल्याचा आरोप नागरिकांमधुन होत आहे. हिवरमाथा शिवारात आठवड्यापासून बिबट्यांच्या मुक्त संचाराने नागरिक भयभीत आहेत. या शिवारातील कुत्रे, पाळीव प्राणी यांना बिबट्याने भक्ष्य बनवल्याच्या घटना वाढल्या आहे. शुक्रवारी अंत्यविधी आटोपून मळ्यांमधील नागरिक घरांकडे परतत असतांनाच सिद्धिविनायक मंदिराजवळ राहणारे विलास धांडे यांच्या घराजवळ एका मोटारसायकलवर बिबट्याने धाव घेतली. ही माहीती गावकऱ्यांना समजल्यानंतर सरपंच खंडेराव धांडे, उपसरपंच बाळासाहेब आमले, बाळासाहेब धांडे, विलास धांडे, गोकुळ धांडे, वैभव धांडे, डॉ. शुभम वारुंगसे यांच्यासह काही नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यावेळेस बिबटे झाडावर दबा धरुन बसले होते.
याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून कळवण्यात आले. बिबट्यामुळे अनुचित प्रकार घडु नये यासाठी सदर गावकरी रात्री अडीच वाजेपर्यंत घटनास्थळी थांबुन होते. मात्र इगतपुरी वनविभागाचे कुणीही घटनास्थळाकडे फिरकले नाही. बिबट्यांनी लहान बालकांना आपले भक्ष्य बनविण्याच्या घटना इगतपुरी तालुक्यात अनेकदा घडल्या असुन तसा प्रकार पुन्हा होऊ नये यासाठी नागरिकांना ह्या घटनेमुळे घराबाहेर पडणेही मुश्किल झाले. इगतपुरी वनविभागाला याबाबत अनेकदा कळवूनही याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. वनविभागाने येथे तात्काळ पिंजरा लाऊन बिबट्याला जेरबंद करावे अन्यथा वनविभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घालून आंदोलन केले जाईल असा इशारा पाडळी देशमुखचे सरपंच खंडेराव धांडे, उपसरपंच बाळासाहेब आमले, माजी सरपंच जयराम धांडे, दिनेश धोंगडे, प्रल्हाद धांडे, रतन धांडे, कृष्णा चौधरी आदी ग्रामस्थांनी दिला आहे.