कसारा घाटात रेल्वे लाईनवर कोसळली दरड ; रेल्वेसेवा झाली सकाळपासून विस्कळीत

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी भागातील मुसळधार पावसामुळे इगतपुरी घाटात रेल्वे लाइनवर दरड कोसळल्याने अनेक रेल्वे गाड्या प्रभावित झाल्या आहे. पंचवटी एक्सप्रेस पास झाल्यानंतर काही वेळात हा प्रकार घडल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले. इगतपुरी भागात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु आहे. रस्ते खराब झाल्याने व अनेक ठिकाणी पाणी साचल्याने नाशिकवरून मुंबईकडे जाण्यासाठी सात आठ तासाचा कालावधी लागतोय. यामुळे अनेक प्रवासी रेल्वेचा आधार घेत मुंबईकडे जात आहे. मात्र आज सकाळी मुसळधार पावसामुळे इगतपुरी हद्दीतील कसारा घाटात पोल नंबर 129/9 ते 130/1 या भागात दरड कोसळली. ही दरड कोसळण्यापूर्वी काही वेळे अगोदर मनमाड-मुंबई पंचवटी एक्सप्रेस या ठिकाणावरून निघून गेल्यामुळे मोठा अपघात टळला. दरड कोसळताच रेल्वेच्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन रेल्वे रुळावर पडलेली मोठे दगड व माती काढण्याचे काम सुरु केले. ज्या भागातून दगड माती पडली त्याच्या आसपास मोकळे झालेले दगड काढून घेण्याचे काम सुरु आहे. घटनेनंतर मुंबईकडे जाणाऱ्या काही गाड्या मनमाड, नाशिकरोड, देवळाली, लहवीत स्थानकावर थांबविण्यात आल्या होत्या. घाट क्षेत्रात तीन रेल्वे ट्रॅक असल्याने पर्यायी रेल्वे ट्रॅक वरून गाड्या हळुवार सोडण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या अनेक गाड्या तास, दोन तास उशिराने धावत आहे. या घटनेने रेल्वे अधिकारी, कर्मचारी सतर्क झाले असून दरड काढण्याचे काम युद्ध्यपातळीवर सुरु आहे.

Similar Posts

error: Content is protected !!