इगतपुरीनामा न्यूज – लोकसभा निवडणुकीसाठी इगतपुरी विधानसभा मतदारसंघातील २८९ मतदान केंद्रात आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्यासाठी १ हजार ६६७ मतदान अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी बंदोबस्तासाठी पोलिसही तैनात करण्यात आले आहे. या विधानसभा मतदारसंघात महिला, युवा, मॉडेल व दिव्यांग विशेष संचलित मतदान केंद्रे देखील सज्ज झाली आहेत. इगतपुरीच्या निवडणूक नायब तहसीलदार वर्षा वाघ यांनी टिटोली महिला संचालित मतदान केंद्राला भेट देऊन सर्वांना मार्गदर्शन केले. इगतपुरी तालुक्यात टिटोली आणि त्र्यंबक तालुक्यात मेटघर किल्ला येथे महिला संचालित विशेष मतदान केंद्र असून त्यामध्ये पाळणाघर, हिरकणी कक्ष इत्यादी सुविधा देण्यात आल्या आहेत. घोटी बुद्रुक येथे दिव्यांग संचालित विशेष मतदान केंद्र असून मोडाळे, खंबाळे येथे मॉडेल मतदान केंद्र सुरु आहे. घोटी बुद्रुक आणि पेगलवाडी येथे युवा संचालित विशेष मतदान केंद्र आकर्षण ठरले आहेत. मतदारांना मतदानाची सुखद अनुभूती मिळावी यासाठी नाविन्यपूर्ण कल्पनांचा वापर करून ह्या मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आलेली आहे. मतदारांना सावली, बसण्याची जागा, पिण्याच्या पाण्याची सोय, दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांना विशेष सुविधा उपलब्ध आहे. लोकशाहीच्या या उत्सवात प्रत्येक मतदाराला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी प्रशासनामार्फत परिपूर्ण प्रयत्न केले जात आहेत. जास्तीत जास्त मतदारांनी मतदान केंद्रावर जावून मतदानाचा हक्क बजावा असे आवाहन करण्यात आले आहे. निरपेक्ष आणि निर्भिड वातावरणात आपल्याला मतदान करण्याचा सुखद अनुभव मिळावा ही बाब विचारात घेऊन प्रत्येक मतदान केंद्रावर पुरेसे मनुष्यबळ आणि यंत्रसामग्रीही उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्यघटनेने आपल्याला मतदानाचा मौलिक अधिकार दिला आहे. या अधिकारामुळे आपण देशात सक्षम लोकशाही उभारू शकतो. त्यामुळे देशातील एक जबाबदार नागरिक म्हणून मी मतदानाचा हक्क बजावला आहे. आज तुम्ही देखील आपला मतदानाचा हा हक्क बजवावा असे आवाहन टिटोली येथील चंद्रप्रभा तुळशीराम भोपे ह्या जेष्ठ महिला मतदाराने केले.
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group