इगतपुरीनामा न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारी जिल्हाध्यक्षपदावरील नुकतीच सोपवलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडल्यामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी गोरख बोडके यांना प्रदेश पातळीवर काम करण्याची सुवर्णसंधी दिली आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गोरख बोडके यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदावर आज निवड करण्यात आली. यासोबतच नाशिकचे कार्यकारी जिल्हाध्यक्षपद सुद्धा कायम ठेवण्यात आले आहे. गोरख बोडके यांना मंत्री ना. छगन भुजबळ यांनी माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार शिवराम झोले यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री ना. छगन भुजबळ यांनी माझ्यावर सोपवलेल्या जबाबदारीच्या माध्यमातून मी सर्वसामान्य जनतेच्या भल्यासाठी कार्य करण्यावर भर देणार आहे. प्रदेश सरचिटणीस, कार्यकारी जिल्हाध्यक्ष म्हणून जनकल्याण आणि पक्षबांधणीसाठी काम करेल असा शब्द राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नूतन प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके यांनी व्यक्त दिला. निवडीचे वृत्त समजताच इगतपुरी तालुक्यासह जिल्हाभरातील कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. महाराष्ट्रात सत्ताधारी असलेल्या पक्षाचे सरचिटणीस पद आणि कार्यकारी जिल्हाध्यक्ष ही दोन्ही पदे एकाचवेळी गोरख बोडके यांच्या रूपाने इगतपुरी तालुक्याला लाभले आहे. ना. छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनातून गोरख बोडके हे राजकारणात दाखल झालेले आहेत. शिरसाठे जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी मोठे कार्य केलेले आहे. बाजार समिती उपसभापती, जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदाची जबाबदारी त्यांनी उत्तम प्रकारे पार पाडलेली आहे. यासह सौभाग्यवती अनिता बोडके यांना सुरगाणा तालुक्यातील जिल्हा परिषद गटात निवडून आणत सरस नेतृत्व सिद्ध करून दाखवले. कोरोनाच्या भयानक काळात सक्रिय राहून जनकल्याण, रुग्णसेवा, मोफत औषधे, ऑक्सिजन पुरवठा, रुग्णखाटा आदी लोकोपयोगी कार्याचा परिपाठ घालून दिलेला आहे. शिरसाठे गटासह संपूर्ण इगतपुरी तालुक्यात विविध विकासाची कोट्यावधी रुपयांची कामे गोरख बोडके यांच्या माध्यमातून झालेली आहेत. इगतपुरी तालुक्यातील बाजार समिती, खरेदी विक्री संघ, सहकारी सोसायट्या आदींमध्ये श्री. बोडके यांचे बावनकशी नेतृत्व दिसून आले आहे. रोटरी क्लबच्या अध्यक्षपदाची धुरा सध्या ते सांभाळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस पदावर त्यांची सार्थ निवड झाली असल्याची प्रतिक्रिया जिल्हाभरात व्यक्त होत आहे.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group