इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील जुनवणेवाडी येथे रस्ता नाही म्हणून मंगळवारी गरोदर मातेला बाळासह आपला जीव गमवावा लागल्याची घटना ताजी असतानाच आज टाके घोटी येथेही मरण अवघड झाल्याची घटना घडली आहे. येथील एका वस्तीवर जाण्यासाठी कोणताही रस्ता नाही. त्यामुळे त्या वाडीतील नागरिक एका शेतकऱ्याचा शेतातील पायवाटेने ये जा करतात. वस्तीत आज एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याचा अंत्यविधी करण्यासाठी मृतदेह स्मशानभूमीत न्यायला एकमेव पायवाटेने शेतातून जात असतांना संबंधित मालकाने इथून मृतदेह नेऊ नका सांगत मज्जाव केला. म्हणून हा अंत्यविधी दिवसभर अडून पडला. याबाबत इगतपुरीचे तहसीलदार अभिजित बारवकर आणि इगतपुरी पोलीस यांना माहिती मिळाल्यावर पोलीस बंदोबस्तात पायवाट मोकळी करून मृतदेह स्मशानभूमीत नेवून अंत्यविधी करण्यात आला. एकीकडे रस्ता नाही म्हणून रुग्णाला जीव गमवावा लागतो तर दुसरीकडे मृतदेहाला स्मशानभूमीत नेण्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी लागते ही दुर्दैवी बाब आहे. रस्त्यासाठी शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या योजना आहेत. मात्र अनेक वस्त्यांमध्ये त्या योजना पोहोचल्या नाहीत. म्हणूनच अनेक गावांत लोकांची दशा अजूनच बिघडत आहे अशी प्रतिक्रिया एल्गार कष्टकरी संघटनेचे संस्थापक भगवान मधे यांनी दिली.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group