इगतपुरीनामा न्यूज – प्रधानमंत्री पीक विमा योजनेला खरीप ते रब्बी हंगामाच्या पुढील तीन वर्षासाठी मान्यता देण्यात आलेली असून ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीद्वारे विविध पिकांसाठी विमा संरक्षण मिळणार आहे. शेतकऱ्यांना ह्या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांनी फक्त १ रुपया विमा हप्ता भरावयाचा आहे. इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन इगतपुरीचे तालुका कृषी अधिकारी रामदास मडके, कृषी पर्यवेक्षक किशोर भरते यांनी केले आहे. महा ई सेवा केंद्र, सामुदायिक सुविधा केंद्र, ग्रामपंचायतींचे संग्राम केंद्र, राष्ट्रीयकृत बँका येथे पीक विमा काढता येईल. विमा योजनेत सहभागी होण्यासाठी ७/१२ उतारा, खाते उतारा, आधारकार्ड, बँक पासबुक, पीक पेरणी स्वयं घोषणापत्र या कागदपत्रांची आवश्यकता आहे.
या योजनेतंर्गत पीक पेरणीपासून काढणी पर्यंतच्या कालावधीत पिकांचे नुकसान झाल्यास शेतकरी बांधवांना ७२ तासांच्या आत पिक विमा ॲप, कंपनी प्रतिनिधी किंवा टोल फ्री क्रमांकावर कळवावे लागणार आहे. शेतकऱ्यांना ई पीक पाहणी अंतर्गत पिकांची नोंद करणे आवश्यक असणार आहे. विमा योजनेत विमा घेतलेले पीक व ई पीक पाहणीमध्ये नोंदवलेले पीक यामध्ये तफावतीचा मुद्दा उद्भवल्यास ई पीक पाहणीमध्ये नोंदविलेले पीक अंतिम गृहीत धरण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी आपल्या पेरणी केलेल्या पिकांस विमा संरक्षण मिळणेसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे. पीक विमा भरण्यासाठी जवळचे आपले सरकार सेवा केंद्र अथवा राष्ट्रीयकृत बँकेशी संपर्क साधण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.