इगतपुरीनामा न्यूज, दि. २ – इगतपुरी तालुक्यातील काळुस्ते जिल्हा परिषद शाळेतून शिक्षणात सुरुवात करून अभिनव शाळा घोटी, जनता विद्यालय घोटी या आदिवासी भागातील शाळांत शिक्षण घेऊन पूनम अहिरे उपजिल्हाधिकारी झाली आहे. तिचे हे स्वप्न स्वप्न साकार झाल्याने आदिवासी भागात आनंद व्यक्त होतोय. भंडारदरावाडी, काळुस्ते, घोटी या गावात आईवडीलांच्या नोकरी निमित्ताने बालपणात पूनमच्या शाळा बदलत गेल्या. जिद्ध, चिकाटीने दररोज नियोजनबध्द अभ्यास करून तिने उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी घातली आहे. तिचे मूळ गाव केरसाणे ता. बागलाण आहे. अभ्यासात सातत्य आणि मेहनत ठेवल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यसेवा २०२१ च्या परीक्षेत ओबीसी मुली गटातून मुलींमध्ये ती राज्यात तिसरी आली आहे. तिने या परीक्षेत घवघवीत यश मिळवित उपजिल्हाधिकारी पद मिळवले आहे. या यशाबद्दल केरसाने गावासह भंडारदरावाडी, काळुस्ते घोटी, खंबाळे, बलायदुरी, टाके घोटी आणि इगतपुरी तालुक्यातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
मागील वर्षी पुनम याच परीक्षेत अधिकारी वर्ग २ पदावर यशस्वी होऊन मंत्रालयात कक्ष अधिकारी सध्या म्हणून कार्यरत आहे. पुनम सध्या आयुष्याची डायरी या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहे पुनम लहानपणापासून हुशार व बुध्दीमान असल्याने तिने अभ्यासात सातत्य ठेवले. या बळावर तिने यश संपादन केले. पुनमचे वडील भिला अहिरे हे बलायदुरी ता. इगतपुरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक तर आई त्याच शाळेत शिक्षिका आहेत. तिला विवेक कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी पद्माकर गायकवाड, तहसीलदार निरंजन कदम, उप मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र परदेशी, प्रा. डॉ. संभाजी खैरनार यांचे मार्गदर्शन लाभले. लहानपणी आमच्या अंगाखांद्यावर खेळलेली आणि शेजारी राहिलेली पुनम अहिरे उपजिल्हाधिकारी झाल्याचे ऐकून आनंदाने डोळ्यातून अश्रू आले असल्याची प्रतिक्रिया भंडारदरावाडीचे ग्रामस्थ सुराजी रावजी मदगे यांनी दिली. अभ्यासात सातत्य ठेवल्यास यश हमखास मिळते. मंत्रालयात कक्ष अधिकारी पद मिळाल्यानंतर आता उपजिल्हाधिकारी पद मिळाले आहे. यापुढे जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न बाळगले आहे. आई-वडील यांनी सहकार्य केल्यामुळे या पदापर्यंत पोहोचली असल्याची हृदयस्थ भावना पुनम भिला अहिरे हिने व्यक्त केली.