विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही नेट परीक्षा पास झालात तर विद्यापीठात किंवा कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापक होऊ शकता. जेआरएफ परीक्षा पास झालात तर पीएच. डी. करण्यासाठी २१ लाखांची शिष्यवृत्ती मिळते. त्यासाठीच २ ते १७ मे २०२१ या कालावधीत संपूर्ण भारतात नेट व जेआरएफची परीक्षा होत आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना याची माहिती नसल्यामुळे सुवर्णसंधी हुकते. याबाबत सर्वांगीण मार्गदर्शन करणारे लिखाण
मार्गदर्शक – प्रा. देविदास गिरी
उपप्राचार्य, इगतपुरी महाविद्यालय
संपर्क – ९८२२४७८४६३
नेट व जेआरएफ परीक्षा स्वरुप आणि तयारी
■ राष्ट्रीय पात्रता चाचणी
राष्ट्रीय पात्रता चाचणी ( National Eligibility Test ) परीक्षा विद्यापीठ अनुदान आयोगाकडून होत असते. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर वरिष्ठ महाविद्यालयात अथवा विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्य करता येते. आता ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. ही परीक्षा पास झाल्यानंतर पीएच. डी. प्रवेशासाठी असलेल्या पीईटी ( PET ) परीक्षेतून सूट मिळते. संपूर्ण देशात ही परीक्षा २ ते १७ मे २०२१ दरम्यान होत आहे.
■ कनिष्ठ संशोधन शिष्यवृत्ती
नेट परीक्षेचा अर्ज भरतांना विद्यार्थ्यांना नेट व जेआरएफ ( Junior Research Fellowship ) या दोन्ही परीक्षांसाठी अर्ज भरता येतो. जेआरएफ साठी मात्र वयाची अट आहे. सर्वसाधारण वर्गातील विद्यार्थ्यासाठी २८ वर्षे वयानंतर ही परीक्षा देता येत नाही. महिला, विद्यार्थीनी व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वयाच्या ३३ वर्षापर्यंत ही परीक्षा देता येते. जेआरएफ परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाकडून पीएच. डी. साठी म्हणजेच संशोधनासाठी शिष्यवृत्ती मिळते. दर महिन्याला ३५ हजार रुपये असे एकूण पाच वर्षांसाठी म्हणजेच ३५००० x ६० महिने बरोबर २१ लाख रूपयांची ही शिष्यवृत्ती मिळते. नेट परीक्षेला मात्र वयाची अट नाही हे विद्यार्थ्यानी लक्षात घ्यावे.
■ नेट व जेआरएफचे स्वरुप
या दोन्ही परीक्षांचा अभ्यासक्रम सारखाच आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या दोन्ही परीक्षांसाठी अर्ज भरला पाहिजे. या परीक्षांसाठी दोन पेपर असतात. पहिला पेपर सर्व विद्यार्थ्यांसाठी सारखाच असतो. पहिल्या पेपरसाठी १०० गुण असून वेळ ६० मिनिटे असतो. दुसरा पेपर २०० गुणांचा असून त्याला दोन तासाचा कालावधी असतो. दुसरा पेपर विद्यार्थ्याच्या पदव्युत्तर वर्गाच्या विषयाशी निगडित असतो.
■ पेपर क्रमांक एकचा अभ्यासक्रम
यासाठी अभ्यासक्रमाची विभागणी दहा घटकांमध्ये करण्यात आली असून हे घटक याप्रमाणे शिक्षण अभियोग्यता, संशोधन आभियोग्यता, भाषा आकलन, संज्ञापन, तार्किक क्षमता गणितासह, तार्किकता, माहितीचे पृथक्करण, माहिती आणि संज्ञापन तंत्रज्ञान, जनता आणि पर्यावरण, उच्च शिक्षण प्रणाली या प्रत्येक घटकावर ५ प्रश्न विचारले जातात एकूण ५० प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्नाला २ गुण असतात. अशाप्रकारे हा पहिला पेपर १०० गुणांचा असतो.
■ पेपर क्रमांक दोनचा अभ्यासक्रम
या पेपरचा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या पदवी व पदव्युत्तर विषयाच्या स्पेशल विषयाशी संबंधित असतो. या अभ्यासक्रमाची व्याप्ती मोठी आहे. कारण अभ्यासक्रम तयार करताना भारतातील सर्व विद्यापीठांचा विचार केलेला आहे. विद्यार्थ्यानी हा अभ्यासक्रम ugcnet.nta.nic.in या संकेतस्थळावरून डाउनलोड करुन घ्यावा.
■ वस्तुनिष्ठ प्रकारच्या प्रश्नपत्रिका
या परीक्षांच्या दोनही प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या झाल्यामुळे या परीक्षांचे स्वरूप आता खूप सोपे झाले आहे. प्रत्येक प्रश्नासाठी ४ पर्याय अथवा विकल्प दिलेले असतात. त्यापैकी विद्यार्थ्याने योग्य विकल्पाची निवड करावयाची असते.
■ परीक्षेचे माध्यम
नेट व जेआरएफ परीक्षेचे माध्यम इंग्रजी व हिंदी असते. विद्यार्थ्यांनी इंग्रजी माध्यम अवघड वाटत असेल तर हिंदी माध्यमाची निवड करावी.
■ अभ्यास कसा करावा ?
नवीन पॅटर्ननुसार दोनही पेपर वस्तुनिष्ठ झाल्याने विद्यार्थ्यांनी खूप वाचन करण्यापेक्षा वस्तुनिष्ठ वाचन करावे. ते करताना तुम्ही स्वतः एका वहीत प्रश्न तयार करा. त्या प्रश्नासमोर त्याचे उत्तर लिहा. या पध्दतीने तुम्ही स्वतः पेपर क्रमांक एक व पेपर क्रमांक दोनचे प्रत्येकी ३००० प्रश्न तयार करा. तुम्ही स्वतः प्रश्न तयार केलेले असल्यामुळे ते प्रश्न चांगल्या प्रकारे तुमच्या स्मरणात राहतील. पाठ करण्याची गरज भासणार नाही हे लक्षात ठेवा.
■ पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण होण्यासाठी
या परीक्षेचा अभ्यास करताना अनेक संदर्भ ग्रंथ व संदर्भ साधनांचा उपयोग विद्यार्थ्याने करणे आवश्यक आहे. रोजचे वर्तमानपत्र आपल्या दोनही पेपरचा अभ्यासक्रम डोळ्यांसमोर ठेवून वाचले पाहिजे. तुमच्या विषयाचे एखादे मासिक, नियतकालिक वाचा. यात तुमच्या विषयाच्या अनेक संकल्पना व विषयांची माहिती मिळू शकते. वाचन वाढवा, विद्यार्थी पदवी व पदव्युत्तर स्तरावरचा अभ्यास करताना गाईडचा वापर करून परीक्षा देतो. येथे ते चालणार नाही. तुम्ही तुमच्या विषयातील काही महत्त्वाचे संदर्भ ग्रंथ वाचले पाहिजेत. सर्व पुस्तक न वाचता अभ्यासक्रम डोळ्यासमोर ठेवून त्याला उपयुक्त असे वाचन महत्त्वाचे ठरेल.
( लेखक इगतपुरी येथील केपीजी महाविद्यालयात उपप्राचार्य म्हणून कार्यरत असून स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शक आहेत. )
18 Comments