प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज, दि. ३१ – नाशिकच्या मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्थांतर्गत आंतरशालेय क्रीडा महोत्सव संपन्न झाला. ह्या महोत्सवात उत्साह, चैतन्य आणि ऊर्जेने प्रेरित सर्व खेळाडूंनी उत्कृष्ठ खेळाचे प्रदर्शन दाखवले. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी संस्थापक प्रकाश कोल्हे, सचिव व मुख्याध्यापिका ज्योती कोल्हे, साईबाबा हार्ट इन्स्टिटय़ूट अँड रिसर्च सेंटरचे संचालक डाॅ. अनिरुद्ध धर्माधिकारी, इंदिरानगरचे पोलीस निरीक्षक संजय बांबळे, युनिक स्किल डेव्हलपमेंट सेंटरचे डाॅ. अश्विनीकुमार भारद्वाज, युवासेना उपजिल्हाप्रमुख प्रविण पाळदे, क्रीडाशिक्षक डाॅ. दिपक जुंद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
सुरवातीला मशाल संचालन होऊन विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रम सादर केले. यात मार्शल आर्ट, शिवकालीन क्रीडा प्रकार, पिरामिड, झुंबा डान्स आदी उत्साहवर्धक कार्यक्रमाचा समावेश होता. मैदानावर लिंबू चमचा, रिले रेस, सॅक रेस, फ्राॅग जम्प, हर्डल, ब्लाईन्ड रेस, कबड्डी, खो खो अशा विविध खेळांचा मनमुराद आनंद खेळाडूंनी आणि प्रेक्षकांनी लुटला. विजेत्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते चषक, प्रमाणपत्र देण्यात आले. ब्राईट इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी खेळांचे सुरेख प्रदर्शन करून कबड्डी आणि खोखो मध्ये प्रथम पारितोषिक प्राप्त केले. अनेक खेळामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय पदक मिळाल्यामुळे ब्राईट इंग्लिश मिडीयम स्कूलला प्रथम पारितोषिक म्हणून घोषित करण्यात आले. मुख्याध्यापिका सुरेखा आवारे आणि उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. क्रीडा महोत्सवावेळी सर्व शिक्षकवृंद, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.