भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. १४ – शरीर उत्तम चांगले.. शरीर सुखाचे घोसूले.. शरीरे साध्य होय केले.. शरीरे साधीले परब्रम्ह.. ह्या संतवचनाप्रमाणे अवघे आयुष्य परमार्थ करण्यासाठी देणारे विरळे.. युक्त आहार विहार आणि परमेश्वराचे नामस्मरण करता करता आपल्या विचारांचा वारसा भक्कमपणे सुरु ठेवणारे तर दुर्मिळच.. असेच तरुणांनाही लाजवेल असे ९४ वर्षीय व्यक्तिमत्व इगतपुरी तालुक्यातील तळोशी येथे आहेत. ९४ वर्षीय हभप सावळीराम बाबा गुंजाळ यांचा अभिष्टचिंतन सोहळा भजनी मंडळ आणि त्यांच्या कुटूंबाने साजरा केला. त्यांचा दिनक्रम पहाटे पाचला काकडा भजनाने सुरु होतो. दिवसभर पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन होऊन संध्याकाळी हरिपाठ असा त्यांचा नित्यक्रम आहे. या वयातही पथ्य असल्याने दिवसातुन एकदाच हलके भोजन घेत असल्याने त्यांचा उत्साह आजही टिकुन आहे. इंग्रजांचा काळ पाहिलेल्या या बाबांचे शिक्षण जुनी बिगारी म्हणजे आजची बालवाडी…तरीही संस्कृत भाषेचे उत्तम ज्ञान, कोणत्याही ग्रंथाचे अर्थफोड करून ते सांगतात. विशेष म्हणजे या वयात सुद्धा ते चष्मा वापरत नाही.
महाराष्ट्र प्रदेश काॅग्रेसचे सचिव भास्कर गुंजाळ यांचे पिताश्री व जुने प्रवचनकार सावळीराम बाबा गुंजाळ यांचे अभिष्टचिंतन सोहळा भजनी मंडळ आणि त्यांच्या कुटूंबाने साजरा केला. ३४ वर्षाच्या रेल्वे सेवेतून निवृत्त झाल्यावर त्यांनी सामाजिक कार्यात वाहून घेतले. लोकनेते स्व. गोपाळराव गुळवे यांच्याशी एकनिष्ठ राहून त्यांनी लोकसेवेत अग्रेसर काम केले. तत्कालीन युती शासनाने एका महामार्गाला १९९४ मध्ये मंजुरी दिली. त्यावेळी गव्हाणे तात्या, स्व. भिका पा. गायकर यांच्यासह कडवा विरोध करुन तो प्रकल्प शासनाला रद्द करण्यास भाग पाडले. नंतरच्या काळात आध्यात्मिक कार्यात स्वतःला झोकुन दिले. पत्नी सौ. तुळसाबाई गुंजाळ, मोठी मुलगी हिराबाई जाधव, मोठा मुलगा मधुकर गुंजाळ, मुलगी सखुबाई कोकणे, मुलगा गोपाल गुंजाळ, मुलगी सरला सहाणे, सर्वात लहान मुलगा भास्कर गुंजाळ, ९ नातू, १० नाती असा त्यांचा मोठा परिवार आहे. सावळीराम बाबांचा वारसा साकुर येथील नातू हभप साई महाराज सहाणे हा तरुण कीर्तनकार चालवित आहेत. वयाचा शताब्दी महोत्सव साजरा करण्यासाठी हभप सावळीराम बाबा गुंजाळ यांना इगतपुरी तालुक्याच्या सर्व क्षेत्रातून भरभरून शुभेच्छा..!