
इगतपुरीनामा न्यूज, दि. १२ – इगतपुरी तालुक्याच्या विकासासाठी सातत्याने कार्यरत राहून शाश्वत विकास साध्य करण्यासाठी लोकनेते गोपीनाथराव मुंढे यांचे विचार दिपस्तंभ ठरले. समाजातील सर्व जातीधर्मासाठी स्व. मुंढे साहेब यांनी दिलेले योगदान अविस्मरणीय आहे असे प्रतिपादन जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके यांनी केले. अवघ्या महाराष्ट्रातील जनतेसाठी प्रत्येक क्षण वेचून फक्त विकासाचा मंत्र सिद्ध करण्यासाठी स्व. गोपीनाथजी मुंढे यांनी केलेले कार्य दिशादर्शक आहे असेही श्री. बोडके शेवटी म्हणाले. मोडाळे ता. इगतपुरी येथे लोकनेते गोपीनाथजी मुंढे सामाजिक सभागृहाचे लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. लोकनेते गोपीनाथराव मुंढे यांच्या जयंतीनिमित्ताने मोडाळे येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. अवघ्या देशाला लाभलेला कोहिनुर हिरा म्हणून स्व. मुंढे साहेब परिचित होते. त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने मोडाळे येथे उभे राहिलेले स्मारक चिरकाल त्यांच्या विचारांची प्रेरणा देईल असे गोरख बोडके म्हणाले. कार्यक्रमाप्रसंगी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी चेअरमन, व्हॉइस चेअरमन, संचालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.