इगतपुरीनामा न्यूज, दि. १५
इगतपुरी तालुक्यातील भरवज निरपण गावात भाम धरणासाठी २०१७ पासून पुनर्वसन झालेले आहे. त्यानुसार पुनर्वसन कामांपैकी अद्यापही काही कामे अपूर्ण आहेत. भरवज निरपण या गावातील रस्ते अत्यंत खराब अवस्थेत असून त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. पुनर्वसनातील अपूर्ण कामे पुर्ण करण्यात यावीत, भाम धरणालगचा परिसर पर्यटन म्हणून घोषित करून निधी उपलब्ध करून द्यावा. केंद्र शासनाची सौभाग्य फ्री लाईट मीटर योजना पुन्हा लागु करून त्याचा लाभ मिळावा. महिलांना केंद्र शासनाच्या स्टार्ट अप योजनेच्या माध्यमातुन महिला सक्षमीकरण करण्यात यावे. केंद्र शासनाच्या अन्य नवीन योजना राबवण्यात याव्यात याबाबत अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद महाराष्ट्र प्रदेश प्रसिद्धी प्रमुख आकाश भले यांनी केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री फग्गनसिंह कुलस्ते यांना निवेदन दिले.
इंदोर मध्यप्रदेश येथे केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री यांची भेट घेऊन विविध विषयावर चर्चा केली. निवेदनात नमूद केलेल्या मागण्यांची दखल घेण्यासाठी राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार आणि पाठपुरावा केला जाईल असे आश्वासन राज्यमंत्री फग्गनसिंग कुलस्ते यांनी यावेळी दिले. आकाश भले यांनी सांगितले की, भरवज निरपण येथील पुनर्वसित अपूर्ण कामांबाबत वेळोवेळी पाठपुरावा करून प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटीबद्ध असून प्रशासनाच्या विरोधात लोकशाही मार्गाने आंदोलनाचा मार्ग निवडण्याची वेळ आली तरी आम्ही डगमगणार नाही. यावेळी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष लकीभाऊ जाधव, दौलत मेमाणे, राजु गांगड, सिताराम गावंडा, चिराग मेमाणे, पांडूबाबा पारधी, गणेशभाऊ गवळी, एम. डी. बागुल आदी उपस्थित होते.