इगतपुरी तहसीलचा पुरवठा अधिकारी ललित पाटील आणि खासगी एजंट सोमनाथ टोचे एसीबीच्या जाळ्यात : ६० रेशनकार्डसाठी ३० हजाराची लाच भोवली

इगतपुरीनामा न्यूज – नवीन ६० रेशनकार्ड काढून देण्यासाठी एका रेशनकार्डचे ५०० रुपयाप्रमाणे ३० हजारांची लाच मागून त्यापैकी ४ हजार स्वीकारणाऱ्या पुरवठा अधिकाऱ्यासह खासगी एजंटला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रांगेहाथ पकडले आहे. इगतपुरी तहसीलदार कार्यालयातील पुरवठा निरीक्षण अधिकारी आणि खासगी एजंट सापळ्यात अडकल्याने इगतपुरी पुरवठा विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. इगतपुरी तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षण अधिकारी ललित सुभाष पाटील, सोमनाथ टोचे रा. भरवीर, ता. इगतपुरी अशी लाचखोरांची नावे आहेत. तक्रारदार त्याच्या गावातील ६० लोकांचे रेशनकार्ड काढून देण्याबाबत पुरवठा निरीक्षण अधिकारी ललित पाटील व गोसावी यांना भेटले होते. यावेळी त्यांनी खासगी इसम सोमनाथ टोचेच्या समक्ष एका रेशनकार्डसाठी ५०० रुपये प्रमाणे दर ठरवून ४ हजार रुपये स्वीकारले होते. तक्रारदाराकडे उरलेल्या २६ हजाराची मागणी केल्याने तक्रारदार यांनी नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला होता. रेशनकार्ड काढून देण्यासाठी ३० हजार रुपये लाचेची मागणी करत त्याबदल्यात ४ हजार रुपये स्वीकारल्याप्रकरणी इगतपुरीचा पुरवठा निरीक्षण अधिकारी ललित सुभाष पाटील, खासगी एजंट सोमनाथ टोचे यांना रंगेहाथ पकडले. पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, हवालदार माळी, विनोद चौधरी, विलास निकम, अनिल गांगोडे, संतोष गांगुर्डे, विनोद पवार, परशुराम जाधव यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. ललित पाटील याला लाचेच्या रकमेपैकी ४ हजार यापूर्वीच पोच झाले असून १० हजार खासगी इसम सोमनाथ टोचे याने स्वीकारल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर-घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन पाटील अधिक तपास करत आहेत

error: Content is protected !!