इगतपुरीनामा न्यूज, दि. ३
इगतपुरी ह्या आदिवासी तालुक्याला शैक्षणिक प्रवाहामध्ये आणण्यासाठी मी वचनबद्ध आहे. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या माध्यमातून तालुक्यातील विविध शैक्षणिक प्रश्न सोडवण्यासाठी माझे प्रथम प्राधान्य असेल असे प्रतिपादन मविप्रचे नवनिर्वाचित संचालक ॲड. संदीप गुळवे यांनी केले. इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आयोजित सत्कार कार्यक्रमा प्रसंगी ॲड. गुळवे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड होते.
याप्रसंगी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लहाने, बाळासाहेब गव्हाणे, उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी, डॉ. डी. डी. लोखंडे उपस्थित होते. ॲड. संदीप गुळवे आपल्या भाषणात पुढे म्हणाले की इगतपुरी तालुका उच्च शिक्षणाच्या बाबतीत सक्षम बनविण्यासाठी माझे प्रयत्न आहेत. त्यादृष्टीने कोणत्या योजना राबविल्या पाहिजे याची माहिती शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्यांनी माझ्याकडे सांगाव्यात. याप्रसंगी संचालक म्हणून निवड झाल्याबद्दल महाविद्यालयातर्फे प्राचार्यांच्या हस्ते ॲड. गुळवे यांचा सत्कार करण्यात आला. प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड यांनी महाविद्यालयातील प्रगतीसह राबवत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. डी. डी. लोखंडे यांनी केले. आभार डॉ. आर .डी. शिंदे यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.