आमदार हिरामण खोसकर यांच्याकडून विधानसभेत प्रश्न उपस्थित ; संबंधितांवर कारवाईची मागणी : इगतपुरीत विविध विभागाच्या उच्चाधिकाऱ्यांनी दिली भेट

इगतपुरीनामा न्यूज, दि. 24

इगतपुरी येथील मतिमंद विद्यार्थ्यांच्या आश्रमशाळेत उलट्या होऊन दोन मतिमंद विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. 4 विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याबाबत इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर यांनी विधानसभा अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला. राज्य शासनाने तातडीने दखल घेऊन प्रस्तुत प्रकरणी संबंधित शाळेवर आणि जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कोणत्याही मतिमंद शाळांना परवानगी दिली जात नसतांना ह्याच शाळेला कोणत्या आधारावर मान्यता देण्यात आली ? याबाबत चौकशी व्हावी अशी मागणी उपस्थित पालकांनी केली आहे.

विषबाधा झाल्यामुळे हर्षल गणेश भोईर वय 23 रा. भिवंडी, मोहम्मद जुबेर शेख वय १० रा. नाशिक हे दोन विद्यार्थी मृत्यू पावले असून देवेंद्र बुरंगे वय १५, प्रथमेश बुवा वय १७ आणि इतर 2 असे 4 जण उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहेत. अनुसयात्मजा मतिमंद निवासी विद्यालय, इंदिरा भारती कर्णबधीर निवासी विद्यालय, रखमाबाई अपंग युवक स्वयंसहायता केंद्र असे मतिमंद विद्यालय चालवणाऱ्या संस्थांची नावे आहेत. दरम्यान जिल्हाधिकारी डी. गंगाथरण, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, उपअधीक्षक माधुरी कांगणे, पोलीस निरीक्षक वसंत पथवे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी, अपंग शिक्षण अधिकारी, आरोग्य सहसंचालक, आरोग्य उपसंचालक, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार परमेश्वर कासुळे, मुख्याधिकारी पंकज गोसावी आणि विविध उच्च अधिकाऱ्यांनी भेट देऊन माहिती घेतली. दरम्यान ह्या प्रकरणामुळे विविध भागात तीव्र संताप व्यक्त होत असून आगामी काळात हे प्रकरण स्फोटक होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!