इगतपुरीनामा न्यूज, दि. १९
सध्याच्या काळात शिवसेनेला लागलेली बंडखोरीची मोठी लागण रोखवण्यासाठी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे सरसावले असून आता ते शिवसंवाद यात्रा काढणार आहेत. शिवसेना आणि शिवसैनिकांना नवी उभारी देण्यासाठी या शिवसंवाद यात्रेचा प्रारंभ नाशिकमधून होणार आहे. गुरुवार दि. २१ पासून ते २३ जुलैपर्यंत उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आदित्य ठाकरे यांच्याकडून ही यात्रा होणार आहे. या माध्यमातून शिवसैनिकांशी संपर्क साधला जाणार आहे. शिवसैनिकांनी आगामी निवडणुकांची जय्यत तयारी करावी आणि कोणत्याही परिस्थितीत बंडखोरांना धडा शिकवायचाच हा ह्या यात्रेचा प्रमुख उद्देश आहे.
गुरुवारी ( दि. २१ ) इगतपुरी येथे दुपारी ३ वाजून ५० मिनिटांनी शिवसंवाद यात्रेचे स्वागत आयोजित करण्यात आले आहे. यावेळी संपर्कप्रमुख भाऊ चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, संपर्क संघटक रिता वाघ, जिल्हा संघटक मंदाकिनी दातीर, कार्यकारिणी सदस्य पवन जाधव, शीतल शेठ, विस्तारक समीर बोडके, श्रुती मोरे, जिल्हा युवा अधिकारी राहुल ताजनपुरे यांच्यासह इगतपुरी तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी इगतपुरी तालुक्यातील आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने महत्वाची चर्चा होणार असल्याचे समजते.