इगतपुरीनामा न्यूज, दि. ९
जोर वाढलेल्या मुसळधार पावसाने इगतपुरी शहरातील नाले गटारी तुडुंब ओसंडून वाहुन अनेक भागातील घरांमध्ये पाणी शिरले आहे. नागरीकांची एकच तारांबळ उडाली असून प्रशासनाचा नाकर्तेपणा चांगलाच चव्हाट्यावर आला आहे. बाजारपेठेतील दुकानांत व रस्त्यावर ओसंडुन वाहणाऱ्या पाण्याने व कोसळणाऱ्या पावसाने अनेक भागाचा संपर्क तुटला आहे. नगर परिषद आरोग्य विभाग व आपत्ती व्यवस्थापन पथकांनी भर पावसात मदत कार्य सुरू केले आहे. नागरीकांनी घराबाहेर पडु नये अशा सुचना दिल्या आहेत. इगतपुरी शहरात पाणी पुरवठा पाईप लाईनच्या अर्धवट कामामुळे अनेक ठिकाणी खोदकामाच्या खड्डयात पाणी साचले आहे. त्यामुले चिखल व डबक्याचा पादचारींना अंदाज न आल्याने अनेक महिला, विद्यार्थी, जेष्ठ नागरीकांना दुखापत झाली आहे. नगर परिषद विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला असून नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. शहराला तलावाचे स्वरूप आल्याने नागरीक त्रस्त झाले आहेत .
आजच्या संकटकळत एकही लोकप्रतिनिधी नगरसेवक जनतेच्या मदतीला पुढे न आल्याने नागरीकांनी याबाबत रोष व्यक्त केला. येणाऱ्या निवडणुकीत बदल घडविण्याचा विचार केला असुन काही भागात मतदान न करण्याचा निश्चय केला आहे. नागरिकांनी शहराचे बकालीकरणाला राजकीय पुढाऱ्यांना जबाबदार धरले आहे. अशीच परिस्थिती राहिल्याने शहराची लोकसंख्या घटत असुन विकास खुंटला असल्याचे बोलले जात आहे. नगर परिषद आरोग्य विभागाने पावसाळ्याअगोदर नाले सफाई न केल्या मुळे शहरात तुंबापुरी होऊन घरांमध्ये पाणी शिरल्याचे नागरीकांचे म्हणणे आहे. काही नागरिक केवळ सोशल मिडीयावर आपले मतांतर व्यक्त करून अफवा पसरवित नागरीकांच्या भावना दुखावत आहेत. मात्र मदतीच्या कार्यात नेटकरी बघ्याची भुमीका बजावत फोटो, व्हिडीओ व्हायरलला महत्व देत आपली प्रतिष्ठा उंचावण्याचा प्रयत्न करून शहरात अधिकारी व प्रशासनाला दोष देत भुमिका मांडत आहेत. कृतिशून्य इगतपुरी नागरिक असल्याचा फायदा प्रशासन घेत असल्याचे दिसून आले आहे.