पाडळी फाट्यावर दुकान फोडुन रोख रक्कम व साहित्याची चोरी : चोऱ्यांच्या घटनांनी नागरिकांमध्ये पसरली घबराट

प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज, दि. ३१

कावनई शिवारातील घटनेनंतर महामार्गालगत पाडळी फाट्यावरील किराणा दुकानाचे शटर तोडुन पहाटे २ वाजेदरम्यान १५ हजार व दुकानातील काही साहित्य असे अंदाजे ३० हजाराची चोरट्यांनी चोरी केल्याची घटना घडली आहे. परिसरात चोऱ्यांच्या घटनांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

महामार्गालगत पाडळी फाट्यावर दीपक धांडे यांचे कपड्याचे व किराणा दुकान आहे. नेहमीप्रमाणे ते रात्री दुकान बंद करुन घरी गेले होते. सोमवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शेजारील कपड्याच्या दुकानात दोन जण झोपलेले असल्याने ते शटर दोराच्या सहाय्याने बंद केले. किराणा दुकानाचे शटर वाकवुन दुकानात प्रवेश केला. यातील १५ हजार रोख रक्कम व दुकानातील काही किराणा साहित्य असे एकुण ३० हजार रकमेची चोरी करुन चोरट्यांनी पोबारा केला. जवळच असलेल्या नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी दीपक धांडे यांना घटनेची माहिती दिली. त्यांनी येऊन पाहिल्यानंतर वाडीवऱ्हे पोलिसांत तक्रार दिली आहे. कावनई शिवारातील घटनेपाठोपाठ पाडळी फाट्यावरही दुकान फोडल्याच्या या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली असुन वाडीवऱ्हे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवुन सदर घटनांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!