काय चालू ? काय बंद ? इगतपुरी तालुक्यात संभ्रम ; प्रशासनाकडून संयुक्त मार्गदर्शनाची जोरदार मागणी

इगतपुरीनामा न्यूज, दि. 6
शासनाने आणि नाशिक जिल्हा प्रशासनाने आजपासून सुरू केलेल्या मिनी लॉकडाऊन बाबत सामान्य जनतेमध्ये प्रचंड संभ्रम आहे. नेमकं काय बंद आणि काय चालू आहे ह्याचा ताळमेळ सुद्धा बसत नाही. एकीकडे बांधकाम क्षेत्र बंद नसल्याचे सांगत सुटायचे अन दुसरीकडे बांधकाम साहित्याची दुकाने बंद करायची असे संभ्रमित वातावरण निर्माण झालेले आहे. इगतपुरी तालुक्याच्या शहरी आणि ग्रामीण भागात परस्पर विरोधी वातावरण निर्माण झालेले आहे. तालुका प्रशासनाने संयुक्तिक निवेदन प्रसिद्धीस देऊन सामान्य जनतेच्या मनातील संभ्रमित अवस्था दूर करण्याची मागणी होत आहे. घोटी, इगतपुरी, गोंदे दुमाला, वाडीवऱ्हे, टाकेद बुद्रुक, साकुर फाटा आदी गावांतील व्यापारी सुद्धा गोंधळलेले असून ह्यावर आजच मार्गदर्शन होण्याची अपेक्षा आहे. ह्या विषयावर सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणावर बऱ्या वाईट चर्चा रंगल्या आहेत.

गेल्या वर्षभरापासून लॉकडाऊन हा आपल्या सगळ्यांच्या परवलीचाच शब्द झाला आहे. मार्च 2020 मध्ये सुरू झालेला लॉकडाऊन तब्बल वर्ष उलटून गेले तरीही अजून काही प्रमाणात का असेना सुरूच आहे. मध्येच थोडीशी अनलॉक प्रक्रिया सुरू झाली न झाली तोच तिकडे कोविडने पुन्हा डोके वर काढले आणि पुन्हा लॉकडाऊन सुरू होणार का? यावर समाजाच्या सगळ्याच स्तरामधून उहापोह होतांना दिसत आहे.
राज्य सरकारने मध्यंतरी मिशन बिगीन अगेन अंतर्गत काही गोष्टी सुरू केल्या होत्या पण कोविड रुग्णांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढू लागल्याने पुन्हा लॉकडाऊन होणार अशी भिती सगळ्यांना वाटत असतांनाच मुख्यमंत्री महोदयांनी नुकतीच या आठवड्यापासून ‘ब्रेक द चेन’ला सुरुवात केली आहे. लॉकडाऊनचा फटका आर्थिक दृष्ट्या परवडण्यासारखा नसल्याचं याआधीच सिद्ध झाल्याने यावेळी मात्र संपूर्ण लॉकडाऊन जाणीवपूर्वक टाळण्यात आला आहे. असे असले तरी मिशन ब्रेक द चेन मध्ये नक्की काय काय सुरू असणार आहे आणि काय काय बंद असणार आहे याविषयी लोकांमध्ये अजूनही संभ्रम असून तो संभ्रम आधी दूर करण्याची आवश्यकता आहे. विशेषतः ग्रामीण भागात याची जास्त आवश्यकता असून कित्येक ठिकाणी स्थानिक पातळीवर यंत्रणेलाच नक्की काय करायचं आहे हे न उमजल्याने या नव्या मिशनची म्हणावी तशी सुरुवात झालेली नाही.

घोटी शहरातील परिस्थिती

जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी स्वतः या सगळ्या गोष्टी स्पष्ट केलेल्या असतांना सुद्धा स्थानिक पातळीवर काही बाबींमध्ये तफावत दिसत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत असून यावर स्थानिक प्रशासनानेच मार्गदर्शन करणे अपेक्षित आहे. त्यामुळे आता स्थानिक प्रशासनानेच याबाबत अधिकृत सूचना जारी करणे आणि नक्की काय चालू, काय बंद, त्याच्या वेळा नक्की कोणत्या या सगळ्याबाबत  सुस्पष्टता आणून संभ्रम दूर करावा अशी अपेक्षा सामान्य नागरिक आणि व्यावसायिक बाळगून आहेत.

प्रशासनाने सर्वांचा गोंधळ दूर करावा

कोरोना रोखण्यासाठी प्रशासनाने लागू केलेले नियम, लॉकडाऊन वगैरे नियम पाळण्यास सर्वजण निश्चितच तयार आहेत. तथापि नेमके काय चालू ? काय बंद ? ह्याचे निश्चित स्पष्टीकरण होत नाही. बांधकाम क्षेत्र बंद नसले तरी त्यांना लागणाऱ्या साहित्याची दुकाने मात्र बंद आहेत. एका गावात एक न्याय तर दुसऱ्या गावात दुसराच न्याय दिसतो आहे. सर्व प्रशासकीय यंत्रणेकडून सर्वांसाठी सर्वांना समजेल असे मार्गदर्शन तात्काळ उपलब्ध करून द्यावे.
भगीरथ मराडे, बांधकाम साहित्याचे व्यापारी घोटी