
इगतपुरीनामा न्यूज, दि. ६
अल्पकाळात देशाच्या नकाशावर झळकलेल्या इगतपुरी तालुक्यातील मोडाळे ग्रामपंचायतीच्या कार्याची दखल विविध क्षेत्रांमध्ये घेतली जाते. विकासाची घोडदौड वेगवान पद्धतीने करणाऱ्या ह्या गावाला “गोदा सन्मान” पुरस्कार घोषित झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील अतिशय सन्मानाचा असणारा हा पुरस्कार असून आतापर्यंत विविध क्षेत्रातील व्यक्तिमत्वांना ह्या पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे. विकासाचा ध्यास घेऊन मोडाळे गावाची आगेकूच करणारे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामस्थ यांना हा पुरस्कार समर्पित असल्याचे ह्या गावाच्या विकासाचे शिल्पकार जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके यांनी सांगितले.
अतिदुर्गम भागात वसलेले मोडाळे हे अतिशय छोटे गाव असून ह्या गावाला बदलून टाकण्यासाठी जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि ग्रामस्थ परिश्रम घेतात. नुकताच देशपातळीवर सन्मानाचा असणारा पुरस्कार गावाने मिळवला. विविध प्रकारच्या विकास योजना परिणामकारक राबविण्यात हातखंडा असलेल्या मोडाळे गावाला गोदा सन्मान पुरस्कार मिळणार आहे. १० मे ह्या दिवशी नाशकात होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्यात पालकमंत्री ना. छगन भुजबळ आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ह्यांच्या हस्ते मोडाळे गावाला पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.