माणिकखांबजवळ महामार्गावर मुदतबाह्य खाण्याची पाकिटे आढळली : अज्ञात वाहनातून फेकलेल्या पाकिटांमुळे विषबाधा होण्याची शक्यता

इगतपुरीनामा न्यूज, दि. ४

मुंबई आग्रा महामार्गावरील माणिकखांब गावाजवळ अज्ञात वाहनातून शेकडो मुदतबाह्य खाद्य पाकिटे फेकण्यात आली आहेत. ह्या भागातील नागरिकांनी ही पाकिटे मोठ्या संख्येने घरी नेली आहेत. ह्या पाकिटांवरील संपलेली मुदत न पाहता ही पाकिटे खाल्ली जाणार आहेत. परिणामी विषबाधा होण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे. अन्न औषध प्रशासन आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने दखल घेऊन संबंधित पाकिटे फेकणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जागरूक नागरिकांनी केली आहे. नागरिकांच्या जीवाला बरेवाईट झाल्यास जबाबदार कोण असा सवाल सुद्धा विचारला जात आहे.

विविध दुकाने आणि टपऱ्यांमध्ये 5 आणि 10 रुपयांना वेफर्स आणि कुरकुरे सारखे खाद्य पाकिटे सर्रास विकली जात असतात. अशा प्रकारची विविध खाद्य असणारी खाण्याची पाकिटे अज्ञात वाहनाने माणिकखांब गावाजवळ महामार्गावर उघड्यावर फेकून दिली आहेत. बुधवारी रात्री ९ च्या दरम्यान हा प्रकार झाल्याचे काही नागरिकांच्या ध्यानात आले. पाकिटे पाहिली असता त्यांची मुदत संपलेली आहे. यातील अनेक पाकिटे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनी उचलून नेली आहे. हे खाऊन जर विषबाधा झाली तर याला जबाबदार कोण ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ही पाकिटे फेकणाऱ्या व्यक्तीचा तपास करून अन्न व औषध प्रशासनाने गुन्हा दाखल करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!