इगतपुरीनामा न्यूज, दि. १
मुंबई आग्रा महामार्गावर अपघात नित्याचेच झाले आहेत. त्यात गोंदे आणि वाडीवऱ्हे परिसरात तर छोटे मोठे अपघात सुरूच असतात. आज ह्या भागात मोटारसायकलचे दोन वेगवेगळे अपघात झाले ह्यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन दोन्ही अपघातातील गंभीर जखमींना नाशिकच्या रुग्णालयात दाखल केले. यामुळे त्यांचा जीव वाचवण्यास मदत झाली.
पहिला अपघात व्हिटीसी फाट्यावर रात्री साडेआठच्या सुमाराला झाला. MH 15 GW 1838 ही मोटारसायकल वाडीवऱ्हेच्या दिशेने येत असतांना अज्ञात वाहनाने हुल दिले. यामध्ये झालेल्या अपघातात भास्कर बाबुराव गवते वय ६० रा. वाडीवऱ्हे हे जखमी झाले. त्यांना नाशिकच्या वक्रतुंड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दुसरा अपघात रात्री पावणेनऊच्या सुमाराला गोंदे फाट्यावर झाला. MH 15 FP 8692 ह्या मोटारसायकलचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. यामध्ये अतुल भीमाशंकर तुसे वय ४४ रा. नाशिकरोड हे गंभीर जखमी झाले. दोन्ही जखमींना नरेंद्राचार्य रुग्णवाहिकेने रुग्णालयात पोहोचल्याने त्यांचा जीव वाचला.