जनसेवा प्रतिष्ठान कडून निराधार व्यक्तीवर अंत्यसंस्कार

इगतपुरीनामा न्यूज दि. ५ : इगतपुरी शहरातील शिवाजी चौकात एक बेवारस व्यक्ती मृतावस्थेत आढळून आली. ही व्यक्ती निराधार असल्याने इगतपुरी शहरात गेले काही दिवस वावरत असल्याचे लक्षात आल्यावर ही व्यक्ती काही वर्षांपूर्वी इगतपुरी येथील गुरुद्वारा मध्ये सेवा देत असल्याचे निष्पन्न झाले. निराधार असल्याने या व्यक्तीचे अंत्यसंस्कार कुणी करायचे हा प्रश्न उभा राहिल्याने ‘जनसेवा प्रतिष्ठान’ने या व्यक्तीच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी घेऊन 3 एप्रिल रोजी सदर व्यक्तीच्या पार्थिक देहावर विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले.
जनसेवा प्रतिष्ठानचे किरण फलटणकर, विशाल चांदे, सागर परदेशी, त्रिलोकसिंग गरचा यांच्यासह इगतपुरी आणि शहापूर येथील गुरुद्वारा मधील बाबाजींनी याकामी पुढाकार घेतला. वैद्यकीय अधीक्षक डॉ. स्वरूपा देवरे, प्रभारी पोलीस निरीक्षक दीपक पाटील, पोलीस कॉन्स्टेबल कोळी, मुकेश महिरे, जयहरी गांगुर्डे आदींच्या मार्गदर्शनाखाली सदर व्यक्तीचे अंत्यसंस्कार पार पाडण्यात आले. दरम्यान जनसेवा प्रतिष्ठानच्या सामाजिक बांधिलकीबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत असून सामाजिक कामांमध्ये शक्य तितका सहभाग घेण्याचा प्रतिष्ठानचा नेहमीच प्रयत्न असतो, यापुढेही राहील अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण फलटणकर यांनी दिली.