इगतपुरीनामा न्यूज, दि. ११
देशात कोरोनामुळे ऑक्सिजनची कमतरता अनेक रूग्णांच्या मृत्यूचे कारण ठरली. पृथ्वीवर ऑक्सीजनचा चांगला आणि एकमेव स्त्रोत म्हणजे झाडे मानली जातात. याचाच आधार घेत इगतपुरी तालुक्यातील गव्हांडे येथील पदवीधर शिक्षक संजय येशी याच्या संकल्पनेतून शाळेत ‘ऑक्सिजन झोन’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू झाला आहे. जिल्हा परिषद शाळेत ‘ऑक्सिजन झोन’ तयार करणारी गव्हांडे ही शाळा जिल्ह्यातील पहिली शाळा ठरणार आहे. अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज ऑक्सिजन झोनचा शुभारंभ करण्यात आला.
ऑक्सिजन झोन हा उपक्रम तालुक्यासह जिल्ह्यातील अन्य शाळांनी राबविला तर विद्यार्थ्यांना ऑक्सिजन देणार्या वनस्पती व त्याचे महत्व समजण्यासाठी निश्चितच मदत होईल. वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें । हा अभंग तुकाराम महाराजांनी वृक्ष वल्ली यांच्यापासून आपल्याला खुप फायदे आहेत, म्हणून तेच आपले सगे सोयरे आहेत. या प्रमाणे तयार केलेला ऑक्सिजन झोन यात अनेक प्रकारच्या वनस्पती या उपक्रमात असल्याने विद्यार्थ्यांना मार्गदर्शक व प्रेरणा देणारा आहे. यावेळी ऑक्सिजन झोनसाठी मनीषा वाळवेकर यांनी तयार केलेले कुंडीतील लागवड नक्षीकाम व सुशोभिकरण यांचे अशोक मुंढे व श्रीराम आहेर यांनी अभिनंदन केले. याप्रसंगी संजय येशी यांनी ऑक्सिजन झोन बाबत सविस्तर माहिती देऊन उपक्रम विद्यार्थी व पालकांसाठी, शाळा व गावासाठी किती महत्वाचा आहे हे सांगितले.
नांदगाव सदोचे केंद्र प्रमुख श्रीराम आहेर यांनी संगितले की पर्यावरण संतुलन कसे राखावे आणि आपल्याला शरीरासाठी लागणारा ऑक्सिजन जो आहे तो निसर्गामध्येच आहे. तसेच पर्यावरणाचे महत्व याचा विचार करून प्रदूषणमुक्त हवा देणाऱ्या तुळशीचे झाड अनेक प्रकारच्या वनस्पती, वेली, फुलझाडे, वेगवेगळ्या प्रकारच्या कुंडीतील केलेली लागवड, व्हरांड्यातील बाग, ऑक्सिजन झोन हा उपक्रम कौतुकास पात्र असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ऑक्सिजन झोनची पहाणी करून सर्व वनस्पतीची माहिती जाणून घेतली. याप्रसंगी मुख्याध्यापक संजय कोळी, पदवीधर शिक्षक तुषार धांडे, मनीषा वाळवेकर आणि ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा वाळवेकर यांनी केले. आभार तुषार धांडे यांनी मानले.