तरुणांसह आजच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार बहुगुणी – प्रवीण महाराज दुशिंग : गोंदे दुमाला येथील हरिनाम सप्ताहात शिवचरित्राचा जागर

रामभाऊ नाठे : इगतपुरीनामा न्यूज, दि. २२

वयाच्या सोळाव्या वर्षी स्वराज्याचे  तोरण बांधणारे राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे गुण अंगिकारले तर आजच्या तरुण पिढीला नवीन जगण्याचा मार्ग सापडेल. कारण शिवाजी या तीन अक्षरांमध्ये खुप मोठी शक्ती असून त्यातून जगण्याचा मार्ग मिळतो. शि-म्हणजे शिकावे कसे, व- म्हणजे  वागावे कसे, जी- म्हणजे संकटामध्ये जगावे कसे हा मुलमंत्र  अंगीकारणे आजच्या तरुण पिढीला फायद्याचे राहील असा उपदेश शिवचरित्रकार प्रा. प्रवीण महाराज दुशिंग यांनी आपल्या कीर्तनामध्ये तरुणांना केला.

गोंदे दुमाला येथे परशुराम बाबा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने सुरु असलेल्या कीर्तन रुपी सेवेमध्ये शिवचरित्रकार प्रा. प्रविण महाराज दुशिंग यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने शिवजयंतीच्या मुहूर्तावर आलेल्या कीर्तनरुपी सेवेमध्ये शिवचरित्रकार दुशिंग महाराज यांनी शिवछत्रपतींच्या जीवनातील अनेक  इतिहासाचे उदाहरणे दिली. आजच्या तरुण पिढीला शिवजयंती साजरी करताना अमाप खर्च टाळून त्यातून तरुण पिढीने योग्य तो संदेश द्यायला हवा. छत्रपतींनी वयाच्या सोळाव्या वर्षी स्वराज्याचे तोरण बांधले होते. परंतु आजची तरुण पिढी ह्या तारुण्यामध्ये व्यसनाच्या आहारी जात असून त्यामुळे तरुण पिढी बरबाद होत चालली आहे. शिवजयंती साजरी करत असताना नुसतं एका दिवसापुरती न करता शिवाजी महाराजांचे गुण अंगीकारून आयुष्यभर त्यांचे आचरण करणे गरजेचे आहे. आजची तरुण पिढी नैराश्य आल्यावर आत्महत्या करतात. छोट्याशा गोष्टीवरून होणाऱ्या आत्महत्या थांबवल्या पाहिजे. आलेल्या संकटांचा सामना केला पाहिजे. नाउमेद न होता परिस्थिशी सामना केला पाहिजे. त्यासाठी शिवाजी हे तीन शब्द खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे तरुण पिढीने ते अंगीकारले पाहिजे. परशुराम बाबा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताहामध्ये परिसरातील नामवंत कीर्तनकार प्रवचनकार पखवाज वादक, गायनाचार्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!