इगतपुरीत गर्दीमुळे कोरोनाला मोकळे रान ; कोणी लक्ष देईना..!

इगतपुरीनामा न्यूज, दि. 13 ( शैलेश पुरोहित )

दिवसेंदिवस कोरोनाच्या आकड्यात कमालीची वाढ होताना दिसत असून राज्य सरकारने कडक निर्बंध घातले आहेत. विकेंडच्या दिवशी कडकडीत बंद ठेवण्यात आला असून इतर दिवशी कडक निर्बंध घालण्यात आल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. असे असताना आज सकाळपासून मात्र इगतपुरीकरांनी बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी एकच गर्दी केली होती. अक्षरशः कोरोनाचे नियम पायदळी तुडवत नागरिकांनी बाजारपेठत “फुल्ल टू” गर्दी केली असल्याचे चित्र पहावयास मिळाले आहे. त्यामुळे एकप्रकारे कोरोनाला आमंत्रण दिले जात आहे. इगतपुरी नगरपरिषद हद्दीत रोज कोरोना रुग्ण आढळून येत आहेत, तर दुसरीकडे इगतपुरी चे नागरिक कोरोना विषाणूच घरी घेऊन जात आहेत.

इगतपुरी येथील नवा बाजार मार्केटमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. तसेच सोमवारच्या दिवशी पटेल चौक, भाजी मंडईमध्ये देखील तूफान गर्दी झाली होती. महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या नवीन नियमावलीचे पालन आता तरी केले जाणार का ? हे पाहावे लागेल. याआधी लागू करण्यात आलेल्या नियम नागरिकांकडून पाळले जात नसल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. तसेच पोलिस प्रशासन वगळता नगर परिषद प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे की काय ? कारण नगरपरिषदेची कोणतीही यंत्रणा काम करताना किंवा गर्दीवर नियंत्रण
मिळवताना अथवा दंडात्मक कार्यवाही करताना दिसून येत नाही.

बाजारात बिना मास्क फिरणारे अनेक सुपर स्प्रेडर

कोरोनाचे रुग्ण वाढत असूनही मार्केटमध्ये अनेकजण मास्क वापरात नाहीत, सुरक्षित अंतर ठेवत नाहीत असे चित्र आहे. भाजी मंडई मध्ये देखील भाजी विक्रेते दाटीवाटीने बसलेले आहेत, तसेच किराणा दुकान, फळांची दुकाने, बँका, ह्यात सुद्धा नागरिकांनी सोशल डिस्टन्स चा फज्जा उडवत कोरोना नियमांची पायमल्ली करताना दिसत आहे व हेच नागरिक सुपर स्प्रेडर ठरत आहे . एकीकडे राज्य सरकार वैद्यकीय अधिकारी आणि पोलिस प्रशासन कंबर कसून काम करत आहे, मात्र कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनासह इगतपुरीकर नागरिक देखील तितकेच जबाबदार आहेत. भविष्यात कोरोनाला अटकाव घालायचा असल्यास प्रत्येकाने जबाबदारी स्वीकारून आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!