इगतपुरीनामा न्यूज दि. १६ : दहावी आणि बारावीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी येत असून विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेचा तणाव आता कमी होणार आहे. दरवर्षी परीक्षा केंद्रावर गैरप्रकार रोखण्यासाठी स्थानिक यंत्रणेव्यतिरिक्त एक भरारी पथक तैनात असते. ते पथक जिल्ह्यातल्या विविध परीक्षा केंद्रांना अचानक भेट देवून गैरप्रकार रोखण्यासाठी कार्यरत असते. यंदा मात्र हे भरारी पथक असणार नाही असे परीक्षा यंत्रणेकडून जाहीर करण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असलेला परीक्षेचा ताण काही प्रमाणात कमी होणार आहे.
दरवर्षी दहावी बारावीच्या परीक्षांमध्ये चालणारे गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथकाची महत्त्वाची भूमिका असते. मात्र कोविड मुळे यंदा परिस्थितीमध्ये बराच बदल झाला आहे. या आधी बोर्डाने शाळा स्तरावरच परीक्षा घेणार असल्याचे जाहीर केले आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. स्वतःच्या शाळेत आणि तणावमुक्त वातावरणात परीक्षा देत असतांना आता भरारी पथक नसल्याने विद्यार्थी अधिक आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावू शकतील, मात्र याचा अर्थ परीक्षेवर कुणाचेही नियंत्रण नसेल असा अजिबात नाही, भरारी पथक नसले तरी शेजारच्या शाळेतील शिक्षकांचे बैठे पथक परीक्षेदरम्यान उपस्थित राहणार असून परीक्षेच्या कामकाजावर पूर्णवेळ लक्ष ठेवून असणार आहे. त्यामुळे गैरप्रकारांना भरारी पथकाच्या ऐवजी ह्या बैठे पथकाच्या माध्यमातून आळा घातला जाणार आहे. विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये गैरप्रकार खपवून घेतले जाणार नसून तसे आढळून आल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल. त्यामुळे तणावमुक्त वातावरणासोबतच कॉपीमुक्त वातावरण राहील याचीही काळजी आता शाळांना घ्यावी लागणार आहे.