इगतपुरीनामा न्यूज, दि. ४
इगतपुरी तालुक्यात आपल्या कार्यकर्तृत्वाने जनमानसात आदराचे स्थान मिळवलेले तहसीलदार परमेश्वर कासुळे यांचा लेखाजोखा कौतुकास्पद आहे. इगतपुरी तालुक्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, राजकीय पदाधिकारी आणि नागरिकांच्या मनात त्यांच्याबाबत चांगल्या संवेदना आहेत. आज तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सकाळपासून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी रीघ लावली. विविध पक्षाचे पदाधिकारी, नागरिक, आजी माजी आमदार, सभापती, उपसभापती, पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्यांनी हजर राहून त्यांना शुभेच्छा दिल्या. लोकांच्या आशीर्वादामुळे वाढदिवसाचा आनंद द्विगुणित झाला असून लोकांसाठी शासनाच्या माध्यमातून काम करतांना उतराई होण्यासाठी बांधील असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
परमेश्वर कासुळे हे २ वर्षांपासून इगतपुरीचे तहसीलदार म्हणून काम पाहत आहेत. तेव्हापासून सामान्य शेतकऱ्यांसह शासनाच्या निर्देशानुसार त्यांनी उत्तम कामगिरी केली आहे. शांत, संयमी आणि अभ्यासूपणाने निर्णय घेतांना कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा त्यांनी नागरिकांसाठी काम करण्यासाठी उत्साह निर्माण केलेला आहे. सामान्य माणसाला योग्य तो कायदेशीर न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. ह्या पार्श्वभूमीवर त्यांनी लोकांमध्ये निर्माण केलेले स्थान महत्वाचे ठरते. आज परमेश्वर कासुळे यांचा वाढदिवस असल्याचे नागरीकांना माध्यमांतून समजल्याने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. तहसीलदार कार्यालयात विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तिमत्वांसह सामान्य शेतकऱ्यांनी श्री. कासुळे यांना भेटून सदिच्छा व्यक्त केल्या. अचानक शुभेच्छांचा वर्षाव झाल्याने तहसीलदार परमेश्वर कासुळे गहिवरून गेले. पूर्वनियोजित नसतांना सर्वांनी व्यक्त केलेल्या आशिर्वादामुळे वाढदिवस अभूतपूर्व झाल्याचे त्यांनी सांगितले. शासनाची जबाबदारी पार पाडतांना लोकांनी व्यक्त केलेल्या भावनांमुळे काम करतांना लोकांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी बांधील असल्याचे ते शेवटी म्हणाले.