
इगतपुरीनामा न्यूज – नवीन ६० रेशनकार्ड काढून देण्यासाठी ३० हजारांची लाच मागणारा इगतपुरीचा पुरवठा अधिकारी ललित पाटील आणि खासगी एजंट सोमनाथ टोचे या दोघांना लाच स्वीकारतांना पकडल्याचे प्रकरण ताजे आहे. त्यातच इगतपुरी तालुक्यात पुन्हा तीन लाचखोराला पकडण्यात नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला यश मिळाले आहे. नागरिकांच्या करातून भरमसाठ वेतन घेऊनही लाच घेऊन लोकांना वेठीस धरणाऱ्यांना पकडल्यामुळे तालुक्यातील नागरिक आनंदी झाले आहेत. इगतपुरी नगरपालिका हद्दीत सीसीटीव्ही बसविणे कम्प्युटर, प्रिंटर पुरविणे व त्याची देखभाल दुरुस्ती कामाच्या बिलाची रक्कम तक्रारदार यांना अदा करण्याच्या मोबदल्यात स्वतःसाठी व मुख्याधिकारी याच्यासाठी सर्वांचे मिळून २७ टक्के प्रमाणे एकूण १ लाख ९० हजार रुपयांपैकी १ लाख ७० हजार रुपये लाचेची मागणी केल्याने तक्रारदार यांनी तक्रार दिलेली होती. त्यानुसार लाचेच्या मागणीची पंचांच्या समक्ष खात्री झाल्याने आरोपी नितीन दगडू लोखंडे वय ४४ पद – सफाई कामगार , इगतपुरी नगर परिषद, वर्ग -४, सुरज रविंद्र पाटील, वय ३२ ,संगणक अभियंता, इगतपुरी नगर परिषद,वर्ग-३, सोमनाथ बोराडे, लेखापाल, इगतपुरी नगर परिषद,वर्ग-३ यांच्या विरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७ , १२ प्रमाणे गुन्हा करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक लाप्रवि नाशिक अमोल वालझाडे, पो. ह. संदीप हांडगे, पो. अंमलदार सुरेश चव्हाण, पो. हवा. प्रफुल्ल माळी यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने कोणीही त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी, किंवा न करण्यासाठी अथवा ते काम करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नाशिक किंवा टोल फ्री क्रमांक 1064 येथे संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे. एल्गार कष्टकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भगवान मधे यांनीही कारवाईचे स्वागत केले आहे. कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याने अथवा खासगी एजंटने काम करण्याच्या मोबदल्यात पैसे मागितल्यास लाचलुचपत विभागाशी न घाबरता संपर्क करावा असे आवाहन भगवान मधे यांनी केले आहे.