इगतपुरीनामा न्यूज – “केवायसी साठी आदिवासी लाडक्या बहिणी घोटी स्टेट बँकेच्या आवारात उघड्यावर मुक्कामी : ५ दिवसांपासून काम होत नसल्याने मुक्कामाचा निर्णय” ही बातमी “इगतपुरीनामा”ने आज पहाटे प्रकाशित केली होती. ही बातमी वाचून इगतपुरी तालुक्यात स्टेट बँकेच्या कारभारावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त केला. बातमीची दखल घेऊन सामाजिक कार्यकर्त्यांनी संबंधित महिलांना चहा आणि बिस्किटे वाटप केली. जिल्हा प्रशासनाने तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना सूचना देऊन ह्या प्रकरणी महिलांचे काम करण्यासाठी आदेशीत केले. उद्या मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचा नाशकात जिल्हास्तरीय कार्यक्रम होणार असल्याने लोकांच्या संतापाचा अतिरेक जिल्ह्यात जाऊ नये म्हणून प्रशासन दक्षता घेत आहे. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदे तथा इंदिरा काँग्रेसचे नेते लकीभाऊ जाधव यांनी घोटी येथील स्टेट बँकेत जाऊन आदिवासी महिलांशी संवाद साधला. त्यांच्या अडचणी समजून घेत बँकेच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फटकारले. आज दिवसभरात सर्व महिलांची कामे प्राधान्याने करावीत. अन्यथा उद्या सकाळी बँकेला टाळे ठोकण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला. इगतपुरी, घोटी, गोंदे आणि वाडीवऱ्हे येथील स्टेट बँकेच्या सर्व शाखांमध्ये टाळे लावण्याचे आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असेही यावेळी त्यांनी सांगितले. माता भगिनींच्या भावनांशी सरकार, बँक आणि प्रशासनाने खेळू नये अन्यथा आदिवासी महिला आणि समाज रुद्रावतार धारण करतील असे त्यांनी बोलतांना सांगितले. बँकेच्या शाखाचा विस्तार करावा. कोणत्याही महिलांच्या खात्यामधून त्यांना मिळालेल्या लाभाची रक्कम कर्जखात्यात वळवू नये यासाठी आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात येणार आहे. दरम्यान ” इगतपुरीनामा न्यूज” आणि लकीभाऊ जाधव यांच्यामुळे आम्हाला न्याय मिळायला मोठी मदत झाली अशी प्रतिक्रिया महिलांनी दिली.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group