आता तरी पुढे हाची उपदेश । नका करू नाश आयुष्याचा ।।
सकळांच्या पाया माझे दंडवत । आपुलाले चित्त शुद्ध करा ।।
हित ते करावे देवाचे चिंतन । करुनिया मन एकविध ।।
तुका म्हणे हित होय तो व्यापार । करा काय फार शिकवावे ।।
इगतपुरीनामा न्यूज, दि. २
स्वतःसह सर्वांचे हित साध्य करण्यासाठी संतसाहित्याचे महत्व अबाधित आहे. डोळे उघडून जागे व्हा आणि आयुष्याचा नाश करणाऱ्या नकारात्मक गोष्टींना बाहेर फेकावे. भारतीय संस्कृती टिकवण्यासाठी परमेश्वराचे नामस्मरण आणि संतांनी सांगितलेल्या मार्गाचे अनुसरण अत्यावश्यक आहे. म्हणून तुकाराम महाराज आर्ततेने आता तरी असा उल्लेख करून भाविकांना निक्षून मार्गदर्शन करतात. चित्त शुद्धी करून नामस्मरण व्हावे. याने विकारांचा नाश होईल. तुकोबांनी दंडवत घालून केलेल्या विनवणीने लोकांचे हित साध्य होईल. परमेश्वराच्या कृपेने मुक्ती, मोक्ष, आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी तुकोबांचा अभंग उपयुक्त ठरेल असा दृढविश्वास महाराष्ट्रातील तरुणांचे लोकप्रिय आशास्थान तथा सुप्रसिद्ध कीर्तनकार हभप चैतन्य महाराज वाडेकर ( चाकण पुणे ) यांनी केले. इगतपुरी तालुक्यातील घोटी खुर्द येथील स्व. ज्ञानेश्वर रेवजी फोकणे यांच्या प्रथम वर्षश्राद्ध कार्यक्रमानिमित्त कीर्तनाच्या दिव्यभव्य कार्यक्रमात ते बोलत होते. माजी सरपंच आत्माराम फोकणे, यादव फोकणे यांनी वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित केलेली किर्तनसेवा सत्कारणी लागेल असेही ते म्हणाले.
त्यांनी पुढे म्हटले की, सध्याच्या बदललेल्या महामारीच्या काळात परमार्थाचे महत्व खऱ्या अर्थाने वाढीला लागले आहे. ह्या महामारीमध्ये जे तरले ते भाग्यवान असल्याने त्यांना आयुष्याचा नाश करू नका असा संदेश संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी अभंगात दिला आहे. ज्यांना आपण आदरस्थान मानतो अशा तुकोबांनी अभंगाच्या शेवटी आपल्यासारख्या सामान्य माणसाला दंडवत घातला आहे. हे फक्त आपले हित साध्य व्हावे यासाठी तुकोबाराय करतात. या सुश्राव्य किर्तनाप्रसंगी स्वानंद वारकरी शिक्षण संस्थेचे प्रमुख विजय महाराज चव्हाण आणि वारकरी विद्यार्थी यांच्यासह गायनाचार्य हभप रोहिदास महाराज मते, हभप तुकाराम महाराज आरोटे, हभप पंढरी महाराज सहाणे, हभप भूषण महाराज जाधव यांनी कीर्तनाला साथ दिली. याप्रसंगी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी माजी सरपंच आत्माराम फोकणे यांनी आभार मानले.
महाराष्ट्रातील तरुणांचे लोकप्रिय आशास्थान हभप चैतन्य महाराज वाडेकर ( चाकण पुणे ) यांनी किर्तनाप्रसंगी संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या घेतलेल्या अभंगाचे सखोल निरूपण केले. विविध समर्पक उदाहरणे देऊन त्यांनी भाविकांचे प्रबोधन केले. त्यांनी घेतलेल्या अभंगाच्या निरुपणाचा सारांश असा आहे. तुकाराम महाराज ह्या अभंगात म्हणतात की लोकांनो आता माझ्याकडे तुमच्यासाठी एकच उपदेश आहे. किंबहुना माझी तुमच्याकडे एकच कळकळीची विनंती आहे. ती म्हणजे आता ह्यापुढे तरी तुम्ही डोळे उघडा, जागे व्हा आणि स्वतःच्या आयुष्याचा असा नाश करू नका. हवे तर मी तुमच्या पाया पडतो, तुम्हांला दंडवत घालतो. परंतु आता तरी तुमच्या वासना निर्मळ करा, मनात विकारांना किंचित देखील थारा देऊ नका. उलट त्यांना बाहेर घालवून देऊन तुमचे चित्त एकदाचे शुद्ध होईल असे करा. त्यासाठी देवाचे चिंतन करा, त्याच्याप्रती भाव शुद्ध करा, मन एकविध करून त्याला शरण जा, कारण ह्यातच मनुष्याचे खरे हित दडलेले आहे. संतश्रेष्ठ तुकोबाराय शेवटी म्हणतात की लोकहो, तुम्ही सर्वजण खरेच हुशार आणि सुज्ञ आहात, तुम्हांला मी आता काय शिकवणार ? परंतु मी एवढेच सांगू शकतो की ज्या कशाने किंवा ज्या कोणत्या व्यापाराने मनुष्याचे खरे हित साधले जाईल त्याने तोच व्यापार करावा. म्हणजेच मनुष्याचे ज्या कशाने अंती उच्च हित साध्य होईल. अर्थात ज्या कशाने मुक्ती, मोक्ष, आत्मज्ञान प्राप्त होईल. त्याने नेहमी तेच काम करावे किंवा तसेच हाती घ्यावे.