राष्ट्रीय महामार्गाच्या शहराबाहेरील रिंगरोडचा विषय तातडीने मार्गी लावा : खा. हेमंत गोडसे

प्रस्तावित रिंगरोडचा नकाशा

इगतपुरीनामा न्यूज, दि. 31
दिवसेंदिवस शहरात वाहतुक प्रचंड वाढत आहे. शहरात येणाऱ्या बेसुमार वाहनांमुळे शहरावर वाहतुकीचा मोठा ताण पडत आहे. शहराच्या विकासासाठी वाहतुकिचे योग्य नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. वाहतुकीच्या संदर्भात आजच विचारणा केल्यास भविष्यात मोठी किंमत मोजावी लागेल असे स्पष्ट करत जे जे करावे लागेल ते सर्व काही करा पण शहरा बाहेरील प्रस्तावित रिंगरोडचा प्रश्न तातडीने मार्गी लावा असे निर्देश खासदार हेमंत गोडसे यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ प्रशासनाला दिले आहेत.
गुजरात, मुंबई, पुणे, मालेगाव या ठिकाणाहून शहरात येणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे. दिवसेंदिवस वाहनांच्या संख्येत भर पडत असल्याने शहराच्या वाहतुकीवर याचा मोठा ताण पडत आहे यामुळे सकाळ संध्याकाळ शहरातील वाहतूक विस्कळीत होत असून अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. शहरात वाहतूकीची मोठी कोंडी होत असल्याने शहरवासियांची कुचंबना होत आहे. भविष्यात होणारी शहरातील जीवघेणी वाहतूकीची कोंडी टाळण्यासाठी शहरालगत २०० फूट रूंदीचा रिंगरोड होणे अत्यंत गरजेचे असल्याचे खासदार गोडसे यांनी मागील महिन्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या लक्षात आणून दिले होते. खासदार गोडसे यांच्या मागणीची दखल घेवून मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला रिंगरोडचा प्रस्ताव तयार करण्याच्या सुचना दिल्या आहेत. रिंगरोडच्या प्रस्तावाला आकार देण्यासाठी आज खासदार हेमंत गोडसे यांनी आपल्या कार्यालयात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ प्रशासनाची बैठक घेतली.
मुंबई, पुणे, मालेगाव, सुरत या दिशेकडून येणारी सर्व वाहने शहरातून जात असल्याने सकाळ संध्याकाळ शहरातील वाहतूक कोलमडून पडत असते. यामुळे तासनतास वाहनांच्या रांगा शहरातील चौकाचौकात बघायला मिळत आहेत. भविष्यात वाहनांची संख्या प्रचंड मोठया प्रमाणावर वाढणार असल्याने आजच नियोजनबध्द वाहतुकीची आखणी करणे गरजेचे असून शहराभोवती रिंगरोड होणे अत्यंत महत्वाचे आहे असे स्पष्ट करत रिंगरोडचा विषय तातडीने मार्गी लावण्यासाठी ठोस पावले उचलण्याचे निर्देश खासदार हेमंत गोडसे यांनी बैठकीत प्रशासनाला दिले आहे. शहराच्या बाहेरूनच वाहने जावीत यासाठी प्रस्तावित रिंगरोड वाडीवऱ्हे, दहेगांव, जातेगाव, खंबाळे, गणेशगाव, ओझरखेड, दुगाव, धागुर, मानोरी, पिंपळनारे, ढकांबे, आंबे दिंडोरी, जउळके दिंडोरी, पिंप्री सैय्यद, लाखलगाव, हिंगणवेढे, चांदगिरी, चिंचोली, वडगाव पिंगळा, विंचूर दळवी, पांढुर्ली, बेलू, साकूर दुमाला, नांदगाव बुद्रुक, बेलगाव कुऱ्हे असा असणार असल्याची माहिती खा. गोडसे यांनी दिली. यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिक्षक अभियंता आर. जी. निगोट, कार्यकारी अभियंता सतिश श्रावगे, प्रमोद बनगोसावी, उपअभियंता पराग सोयगावकर, एन. के. बोरसे आदी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!