कवितांचा मळा : चुलीवरची भाकर

कवी : लिलाधर दवंडे, आजनी बु. नागपूर, ८४१२८७७२२०

चुलीवरल्या भाकरीची, चवच असते न्यारी
करावी लागते त्यासाठी, बरीच मात्र तयारी

पाट्यावरचे वाटणे म्हणजे, असते कसरत
आता गाव संस्कृती ही, झाली मात्र जमागत

चुलीतला जाळ जरी, झोंबत होता अंगास
तेव्हाच कुठे लज्जत यायची, भाकरीच्या रंगास

उल्ह्यातून चिमणीसारखा, निघत होता धूर
आता चित्र असे चुलीचे, दिसत नाही दूर दूर

मायेचा गोडवा होता, चुलीवरच्या भाकरीत
गावागावातून हरवली, ही स्वयंपाकाची रीत

आठवता जुने दिस, सहज डोळ्यांत येतं पाणी
एखाद भाकर द्यावी बनवून, चुलीवरची कुणी

जुनं सारं सोनं होतं, एवढं मात्र खरं आहे
निभावून घ्यावं लागतं, म्हणून सारं बरं आहे

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!