इगतपुरीनामा न्यूज दि. ०६ :
कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंधरा ते अठरा वयोगटातील मुलांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात सुरुवात झाली आहे. इगतपुरी येथील संजीवनी माध्यमिक आश्रमशाळेत निवासी विद्यार्थ्यांसाठी लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. आश्रमशाळेतील निवासी विद्यार्थी आणि तळेगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांसह एकूण ६५ विद्यार्थ्यांना यावेळी कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली.
प्राथमिक आरोग्य केंद्र, नांदगाव सदो यांच्यातर्फे हे लसीकरण आयोजित करण्यात आले होते. कोविडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सर्वांनी नियमांचे पालन करावे, विद्यार्थ्यांनी लसिकरणासाठी स्वतःहून पुढे यावे तसेच कुटुंबीयांना सुध्दा लस घेण्यास प्रवृत्त करावे असे आवाहन नांदगाव सदो प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. पूजा पगारे यांनी यावेळी केले. आरोग्य सहाय्यक पी. एम. वाणी, श्रीमती एन. एम. वाघ, आरोग्य सेवक भास्कर पराडे, अश्विनी खेमनर, गटप्रवर्तक रुक्मिणी वळकंदे, आशा सेविका निता पगारे, वाहन चालक किसन भागडे आदींनी या लसीकरणाचे आयोजन केले होते. मुख्याध्यापक एम. एम. गोसावी यांच्यासह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.