इगतपुरीनामा न्यूज, दि. ३१
इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावच्या जिंदाल पॉलीफिल्म्स् कंपनीच्या प्रवेशद्वारावर कामावर घेण्यासाठी कामगारांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. ह्यातील उपोषणाला बसलेल्या ४ कामगारांची प्रकृती खालावत चालली असल्याचे समजते. कंपनीच्या व्यवस्थापनाकडून आमरण उपोषणाला कोणताही प्रतिसाद मिळाला नसून ह्यामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. भर थंडीत सुरू असलेल्या उपोषणकर्त्यांनी जीव गेला तरी बेहत्तर पण न्याय मिळाल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याचे सांगितले. उपोषणस्थळावर विविध पदाधिकाऱ्यांनी भेटी देऊन आम्ही कामगारांच्या सोबत असल्याचे सांगत पाठिंबा कळवला आहे.
अधिक माहिती अशी की, यापूर्वी मुंढेगाव येथील २५ कामगारांना जिंदाल कंपनीने कोणतेही कारण न सांगता कामावरून काढुन टाकले होते. त्यामधील १० कामगारांना कंपनी प्रशासनाने कामावर घेतले परंतु उर्वरित १५ कामगारांना १ महिन्यात कामावर घेऊ असे आश्वासन कंपनीने दिले होते. परंतु त्या १५ जणांना अद्यापही कामावर घेतलेले नाही. त्यामुळे कामगारांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरत आहे.
याबाबत कामगारांनी दोन वेळा कामगार उपायुक्त कार्यालयात
झालेल्या बैठकीत उर्वरित १५ स्थानिक कामगारांना १ फेब्रुवारी २०२१ ह्या दिवशी कामावर घेण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र जिंदाल व्यवस्थापनाकडून संबंधित मुंढेगाव येथील १५ मुलांना कामावर घेतलेले नाही. म्हणून ह्या स्थानिक भुमिपुत्रांनी २७ डिसेंबरपासून कंपनीच्या प्रवेशद्वारावर आमरण उपोषण सुरू केलेले आहे. उपोषणामुळे यादव लालू गतीर, योगेश लक्ष्मण गतीर,शांताराम अशोक कडू, संतोष रवींद्र रोकडे ह्या ४ कामगारांची तब्येत खालावत चालली असल्याचे समजते. अजय खंडू रोकडे, विनोद सोनू गतीर, धोंडू गजरू दुभाषे, खुशाल दुंदा दळवी, गौतम रतनलाल तांगडे, माधव काशिनाथ गतीर, केशव कुंडलिक गतीर, आनंद रामचंद्र लहाने, हरिश्चंद्र महादू दुभाषे, सचिन जगन गतीर, योगेश विठ्ठल गतीर हे कामगार उपोषण सहभागी आहेत. या उपोषणात कुठल्याही प्रकारचा न्यायालयीन अथवा कायदेशीर प्रश्न निर्माण झाल्यास अथवा व्यवस्थापनाला कायदेशीर बाबींस सामोरे जावे लागल्यास किंवा यातील कोणत्याही इसमास आर्थिक, मानसिक, शारीरिक इजा अथवा नुकसान झाल्यास त्यास जिंदाल पॉलीफिल्म्स मुंढेगाव व्यवस्थापन, त्यांचे मालक व येथीलअधिकारी व्यक्तिश: जबाबदार राहतील असा इशारा कामगारांनी दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आला आहे.