रविवार विशेष : पुस्तक परिचय

“शेतीमातीची” सलं व “गावकुस” हे दोन काव्यसंग्रह वैशाली प्रकाशन, पुणे यांच्या प्रकाशनाचे माध्यमातून गुढीपाडवा, चैत्र शुद्ध १, श्री शालिवाहन शके १९४३, मंगळवार दिनांक १३ एप्रिल,२०२१ रोजीच्या मराठी नववर्षाच्या शुभ मुहूर्तावर प्रकाशित होत आहे.
ग्रामीण भागातील चाली – रीती, रुढी – परंपरा, सण – वार, देव – दैवते, कोरोना रुपाने वैश्विक मानव जातीसाठी निसर्गाने उभे केलेले आव्हान, पोलीस, आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका, जंगल निसर्ग, आई- वडील, बहीण – भाऊ, कष्टकरी शेतकरी यांच्या व्यथा, राजकीय पटलावर कार्यरत विकास पुरुष, बालपणीचे मित्र, शिक्षक, विविध सहकारी पतसंस्था, बँका, जिल्हा परिषद, ग्रामीण मराठी शाळा, नशा बंदी आदी विषयावर वास्तव लिखाण काव्य स्वरुपात सादर करण्याचा प्रयत्न उभय काव्य संग्रहातून केला आहे.
माझा जन्म ग्रामीण भागातील असल्यामुळे ग्रामीण भागातील बालपण व शेतकरी जीवन याचा अभ्यास जवळून केला आहे. ग्रामीण जीवनाचे ज्ञात वर्णन काव्य स्वरुपात मांडुन त्यास साजेसे चित्र सोबत रेखाटून प्रत्येक काव्य विषय जिवंत करण्याचा व शेतकऱ्याच्या ग्रामीण जीवनाचा उहापोह करण्याचा प्रयत्न काव्य संग्रहात केलेला आहे.
“शेतीमातीची सलं” व “गावकुस” हे पुस्तक रुपात प्रकाशित होणारे सर्व काव्य या अगोदर फेसबुक व व्हॉट्सअप या माध्यमांद्वारे वेळोवेळी काव्य रसिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न यापूर्वीच केला आहे.
माझ्या उभय काव्य संग्रहास अनुक्रमे “शेतीमातीची सलं” या काव्य संग्रहात माझे दैवत आई सौभाग्यवती जिजाबाई पोपट खैरनार हिची प्रस्तावना घेतली असुन “गावकुस” या काव्य संग्रहात माझे वडील श्रीमान पोपटराव पांडुरंग खैरनार यांची प्रस्तावना घेतली आहे.
“शेतीमातीची सलं” व “गावकुस” दोनही काव्य संग्रह थोड्याच अवधीत प्रकाशित होऊन आपणास मेजवानी म्हणुन समस्त काव्य रसिकांसाठी व वाचकांसाठी उपलब्ध होत आहे.
आपण समस्त रसिक माझ्या काव्य संग्रहाचे समीक्षण करुन माझ्या काव्य लिखानास शब्दरुपी आशीर्वाद द्याल ही अपेक्षा !

आपला स्नेहांकीत,जी.पी.खैरनार, नाशिक ९४२१५११७३७ ७०८३२३४०२१

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!