वाल्मीक गवांदे : इगतपुरीनामा न्यूज, दि. १७
सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रात बैलगाडा शर्यत सुरु करण्यास मंजूरी दिली आहे. बैलगाडा मालक, शौकीन, बैलगाडा प्रेमी यांच्यासह मराठी माती आणि संस्कृतीचा अभिमान असणाऱ्या प्रत्येकासाठी ही अत्यंत आनंदाची बाब आहे. याबाबत इगतपुरी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने खासदार अमोल कोल्हे यांचे स्वागत केले असून न्यायालयाच्या निर्णयाचे देखील स्वागत यावेळी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष अनिल पढेर यांनी केले आहे. यावेळी माजी जि. प. सदस्य गोरख बोडके, युवानेते गणपत जाधव, कार्यध्यक्ष मदन कडू, मनीष भागडे, सागर टोचे, ऋतिक जाधव यांनीही शासनाला धन्यवाद दिले आहेत.
बैल पाळणार्या शेतकर्यांच्या मते बैल हे आमच्या कुटुंबाचे भाग आहेत. त्यांच्यावरच आमचे अस्तित्व अवलंबून असल्याने पोटच्या पोराप्रमाणे आम्ही त्यांना जपतो. प्राणी प्रेमाचा कळवळा असलेल्या संस्थांच्या कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष काय होते, ते माहिती नसते. शर्यतींच्या बंदीमुळे राज्यातील खिल्लार बैलांची संख्या कमी झालेली आहे. आंतरराष्ट्रीय संस्थेकडून चांगले मानधन मिळवण्यासाठी या संस्था आमच्यावर अन्याय करीत आहेत, असा शर्यत शौकिनांचा आरोप आहे. न्यायालयाच्या निकालाने आता पुन्हा यात्रा-जत्रा बहरतील, ‘सर्जा-राजा’ डौल-दिमाखात बाहेर पडतील, धावतील. ‘भिर्रर्र… झाली… झाली’ च्या आरोळ्यांनी रानमाळ निनादून उठेल, फज्जावर भगवे निशाण मराठी अभिमानाने फडकेल! सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे आपल्या पशूधनाची जीवापाड सांभाळ करणार्या शेतकर्यांचे म्हणजेच बळीराजाचे आपल्या सर्जा-राजावरील प्रेमच जिंकले. आपल्या संस्कृतीत पशूधनालाही दैवताचे स्थान आहे. यातून पशूधनाचे जतन, संवर्धनाचाही विचार केला गेला आहे. शर्यतीमधून याला प्रोत्साहन मिळत असे. बळीराजाचे पशूधनावरील प्रेमाचे बळच होते अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे उपजिल्हाध्यक्ष अनिल पढेर यांनी यावेळी बोलतांना दिली.