इगतपुरीनामा न्यूज, दि. १४
प्राणिमात्रांवर दया करावी, त्यांची जमेल तशी सेवा करावी असे प्रबोधन अनेकजण करीत असतात. मात्र ह्या तत्वांचे पालन करतांना मात्र सर्वांना ह्याचा विसर पडतो. अशा स्थितीत विनामोबदला प्राण्यांवर औषधोपचार करणारे अगदी दुर्मिळच… यासह उपचार करणाऱ्याला जखमी प्राणी इजा करण्याची शक्यता असते. ईश्वराची सेवा म्हणजे प्राण्यांची सेवा असल्याचे प्रत्यक्षात आचरण करणाऱ्या खाजगी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश धोंगडे यांनी जखमी मोकाट गायीवर उपचार घेऊन आदर्श घडवला आहे. मुंबई आग्रा महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धड़केने जखमी झालेल्या एका गायीवर त्यांनी तत्काळ उपचार करत भूत दया हीच ईश्वर सेवा असते याचे उत्त्तम उदाहरण घालून दिले.
कोरोना काळात वैद्यकीय उपचार किती महत्वाचे असते याचे महत्व नागरिकांना कळले. मात्र अनेक नागरिकांना महागड्या उपचारांचा खर्च परवडत नसल्याने जीव सुद्धा गमवावा लागला. त्यामुळे पैसा किती महत्वाचा असतो याचे महत्व देखील नागरिकांना समजले असे असतांना एका पैशाचीही अपेक्षा न करता केवळ एका सजग नागरिकाच्या फोन कॉलवर अपघातस्थळी दुरवरुन येत डॉ. गणेश धोंगडे यांनी जखमी गायीवर उपचार केले. नाशिक मुंबई महामार्गावर रायगडनगर जवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एक गाय जखमी झाली. तिचा पाय व शिंग मोडल्यामुळे मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव सुरु होता. अज्ञात वाहन चालक जखमी अवस्थेतील गायीला तिथेच टाकून पळून गेला. नाशिक येथील सामाजिक कार्यकर्ते योगेश पवार यांनी जखमी गायीबाबत वाडीवऱ्हेचे पत्रकार शरद मालुंजकर यांना संपर्क साधून मदत मागितली. त्यांनी वेळ न दवडता पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश नेहते यांना कळवले. मात्र ते लांब असल्याने त्यांनी खाजगी डॉ. गणेश धोंगडे यांना तात्काळ घटनास्थळी पाठवले. डॉ. धोंगडे यांनी मुरंबी येथून घटनास्थळी जात अपघातग्रस्त जखमी गायीवर तातडीने उपचार केले. मोडलेला पाय व्यवस्थित बसवून त्यावर कामट्या बांधून गायीला इंजेक्शन आणि योग्य ते उपचार केले. त्यामुळे रक्तस्राव थांबल्याने गाय काही क्षणात उठून उभी राहिली. त्यामुळे योगेश पवार, डॉ. गणेश धोंगडे यांच्या चेहऱ्यावर समाधान पसरले. फक्त एका सजग नागरिकाच्या फोनवर विनामूल्य सेवा देणारे डॉ. गणेश धोंगडे आणि डॉ. राजेश नेहते या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची सेवा खरोखर कौतुकास्पद आहे अशी भावना योगेश पवार यांनी व्यक्त केली.