
इगतपुरीनामा न्यूज, दि. १३
कोरोना महामारीमुळे गेल्या २ वर्षांपासून शाळांची घंटा निःशब्द झाली होती. आज इगतपुरी तालुक्यातील जिल्हा परिषदांच्या शाळांची थंडावलेली घंटा घणाणली. चिमुरड्यांच्या गलबलाटाने शाळांच्या भिंती जणू आनंदाश्रू ढाळत होत्या. धामडकीवाडी ह्या अतिदुर्गम आदिवासी वाडीतील शाळेचा प्रवेशोत्सव विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थ यांच्या मोठ्या उत्साहात संपन्न झाला. १ ते ४ थी च्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना सजवलेल्या बैलगाडीतून मिरवणूक काढून शाळेत आणण्यात आले. विद्यार्थी शाळेत आल्यावर त्यांना दर्जेदार मास्क, गुलाब पुष्प, फुगे देण्यात आले. शाळेत आल्यानंतर विद्यार्थ्यांना झालेला प्रचंड आनंद पाहून ग्रामस्थांनी जल्लोष केला. यावेळी मुख्याध्यापक तथा आदर्श शिक्षक प्रमोद परदेशी आदींच्या डोळ्यांतूनही आनंदाचे अश्रू वाहत होते.
नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या आदेशाने आज पासून इगतपुरी तालुक्यात नियमित शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. त्यानुसार कोरोना महामारीच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांची तापमान तपासणी, स्पर्शविरहीत सॅनिटायझर मशीनद्वारे हातांची स्वच्छता, मास्क लावून धामडकीवाडी शाळेत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव संपन्न झाला. ग्रामपंचायत सदस्य गोकुळ आगिवले यांनी स्वयंस्फूर्तीने त्यांच्या बैलगाडीतुन विद्यार्थ्यांना वाजतगाजत शाळेत आणले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोकुळ आगिवले, चांगुणा बबन आगिवले, खेमचंद आगिवले, आशा कार्यकर्ती धोंडीबाई आगिवले, सहकारी शिक्षक दत्तू निसरड आदी उपस्थित होते.
