इगतपुरीनामा न्यूज दि. २५ : कोविड महामारीमुळे बंद असलेल्या राज्यातील प्राथमिक शाळांची घंटा तब्बल दीड वर्षानंतर वाजणार आहे. एक डिसेंबर पासून राज्यातील सर्व शाळा पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या निर्णयाचे पालक, विद्यार्थी शिक्षक या सर्वांकडून स्वागत केले जात आहे.
दिवाळीपूर्वी राज्यातील ग्रामीण भागातील शाळांमध्ये पाचवीपासून तर शहरी भागातील शाळांमध्ये आठवी पासून वर्ग भरविण्यासाठी परवानगी देण्यात आली होती, त्यावेळी परिस्थितीचा बऱ्यापैकी अंदाज प्रशासनाला आला आहे. तोच पॅटर्न कायम ठेवून आता राज्यात पहिलीपासून वर्ग भरणार असल्याचे आता निश्चित झाले असून एक डिसेंबर पासून प्रत्यक्षात वर्ग सुरू होणार आहेत. दरम्यान हा निर्णय किमान ग्रामीण भागासाठी तरी फार पूर्वीच घेतला जाणे अपेक्षित होते, मात्र कोविड परिस्थितीचा नेमका अंदाज दिवाळी कालावधीमध्ये आला नसल्याने शाळा उघडण्याचा निर्णय प्रलंबित ठेवला जात होता. मागच्या आठवड्यात टास्क फोर्सने सुध्दा पहिलीपासून वर्ग भरविण्यासाठी परिस्थिती अनुकूल नसल्याचा अहवाल दिला होता, मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे या निर्णयाला सर्वच थरातून विरोध होवू लागलेला होता. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने या निर्णयाचा फेरविचार करून अनुकूल भूमिका घेतल्याने पालक, शिक्षक विद्यार्थी यांच्याकडून समाधान व्यक्त करण्यात आले आहे.