इगतपुरीनामा न्यूज, दि. २३
लोकसहभागीय नियोजन प्रक्रियेसाठी आवश्यक असणारा क्षमता बांधणी प्रशिक्षणाचा कार्यक्रम बहुमोल आहे. “आमचं गाव आमचा विकास” या उपक्रमामधून इगतपुरी तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीस पुढील पाच वर्षात त्यांच्या प्राधान्य क्रमानुसार कामे / उपक्रम हाती घेण्याची संधी उपलब्ध होत आहे. त्यामुळे आपल्या गावचा व पर्यायाने आपला विकास आपल्याच हाती असल्याची भावना वृद्धींगत होणार आहे. ह्याचा सर्वांनी फायदा घ्यावा असे आवाहन टिटोलीचे सरपंच अनिल भोपे यांनी केले. नाशिक जिल्हा परिषद, पंचायत समिती इगतपुरी आणि राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान ( RGSA ) महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आमचं गांव आमचा विकास ( GPDP ) उपक्रमांतर्गत विकास आराखडा सन २०२२- २३ तयार करण्यासाठी नांदगावसदो गणाच्या कर्मचारी प्रशिक्षणाप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, प्रत्येक गावाचा विकास करण्यासाठी ह्या कार्यक्रमात दिले जाणारे प्रशिक्षण ग्रामविकासाचा वेग गतिमान करणारे आहे. कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेऊन गांव समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करावे असे ते शेवटी म्हणाले. यावेळी टिटोलीचे माजी उपसरपंच दौलत बोंडे, ज्ञानेश्वर भटाटे, भावली खुर्दचे उपसरपंच दौलत भगत, बोरटेंभेचे ग्रामसेवक ज्ञानेश्वर पाटील आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
या प्रशिक्षण कार्यक्रमात तज्ञ प्रशिक्षक म्हणून एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या पर्यवेक्षिका ज्योती काळे, शिक्षण विस्ताराधिकारी कैलास सांगळे यांनी उपस्थितांना प्रशिक्षित केले. हा प्रशिक्षण कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टिटोली येथे आज संपन्न झाला. तंत्रस्नेही शिक्षक सिद्धार्थ सपकाळे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका मंगला शार्दूल, राजकुमार गुंजाळ, आदर्श शिक्षक प्रमोद परदेशी, अतुल अहिरे, माणिक भालेराव यांनी परिश्रम घेतले. दोन दिवशीय प्रशिक्षण नंतर प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा, बाल सभा घेऊन गांव विकास आराखडा तयार करण्यासाठी नियोजन करावयाच्या तारखा देण्यात आल्या.