उत्तर महाराष्ट्रातील प्रश्न सोडवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार – आ. सत्यजीत तांबे : ग्लोबल शासकीय विश्रामगृह येथे विविध संघटनांसह पार पडली बैठक

इगतपुरीनामा न्यूज – आमदारकीच्या पहिल्या दिवसापासून सुरु झालेला आमदार सत्यजीत तांबे यांचा आभार दौरा सातत्याने सुरूच आहे. याच आभार दौऱ्यादरम्यान त्यांनी आज ग्लोबल शासकीय विश्रामगृह येथे विविध डॉक्टर्स असोसिएशन्स, शैक्षणिक व पदवीधर संघटनांच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांची भेट घेऊन त्यांचे प्रश्न आणि समस्या जाणून घेतल्या. आपण मांडलेल्या सर्व समस्या आणि प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरु असून यासंदर्भात शासन स्तरावर योग्य तो पाठपुरावादेखील सुरु असल्याचे आमदार सत्यजीत तांबे यांनी यावेळी सांगितले. आमदार झाल्यानंतर पहिल्याच अधिवेशनात विविध मुद्दे उपस्थित करून छाप पाडणाऱ्या आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांतून नाशिकच्या कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज स्मारकस्थळी अतिरिक्त बांधकाम करून त्याठिकाणी अद्ययावत असे ‘मराठी भाषा अभ्यास केंद्र’ तयार करण्यासाठी शासनाने ५० लाख इतका निधी मंजूर केला आहे. नाशिक मनपा शाळांचा आदर्श शाळा म्हणून नमुना तयार करण्यासाठी आणि मालेगावच्या उर्दू शाळांच्या विकासासाठी प्रत्येकी ५० लाखांचा निधी उपलब्ध आहे. एकंदरीत नाशिक जिल्ह्यासाठी दिड कोटींचा निधी शासनाकडून खेचून आणण्यात आमदार तांबे यशस्वी झाले आहेत.

नाशिक पदवीधर मतदारसंघ हा फार व्यापक आहे. ५ जिल्हे ५४ तालुके व ४ हजार गावांचा यात समावेश आहे. याच मतदारसंघातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा तांबे यांचा प्रयत्न सुरु असून टप्प्याटप्प्याने ते संपूर्ण मतदारसंघाचा दौरा करत आहेत. आमदार म्हणून निवडून आल्यापासून मुंबई व संगमनेरचा मुक्काम सोडला तर दररोज सरासरी ५००- ६०० किमी इतका प्रवास करूनही थकण्यापेक्षा मला ऊर्जाच मिळत असल्याची भावना आमदार सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केली आहे. एकदा निवडणूक झाली की लोकप्रतिनिधी मतदारसंघात दिसणे तसे फार दुर्मिळ असते. लोकप्रतिनिधींकडे काही काम असेल तर तालुक्याच्या किंवा शहराच्या ठिकाणी असलेल्या त्यांच्या कार्यालयात मतदारांना चकरा माराव्या लागतात. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील लोकांना मोठ्या प्रकल्पांच्या आणि विकासकामांच्या अपेक्षा नसून सरकारी कार्यालयात त्यांची छोटी-छोटी कामं होत नाही याचाच जास्त त्रास होत असतो. मात्र याला अपवाद ठरलेल्या आमदार सत्यजीत तांबे यांचा हा आभार दौरा इतर सर्व लोकप्रतिनिधींसाठी एक आदर्शच म्हणावा लागेल.

Similar Posts

error: Content is protected !!