इगतपुरीनामा न्यूज, दि. २०
इगतपुरी मतदारसंघात महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत इंदुमती लॉन्स वाडीवऱ्हे येथे मोदी सरकारविरोधात रात्रभर जागरण गोंधळाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या गोंधळात केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांवर व भरमसाठ वाढणाऱ्या इंधन व जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीविरोधात गाण्यांच्या माध्यमातून शाहीर उत्तम गायकर यांच्या आनंदतरंग या कलापथकाने जोरदार हल्ला चढवत प्रबोधन केले. महसूलमंत्र्यांसोबत जवळपास ३०० कार्यकर्त्यांनी जागेवरच मुक्काम करत सकाळी वाडीवऱ्हे गावातून प्रभातफेरी काढली.
यावेळी महसूलमंत्री ना. थोरात यांनी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार प्रहार करत टीका केली. गेल्या सात वर्षांत कधी नव्हे इतकी महागाई वाढली असताना सरकारने एकच उद्दिष्ट ठेवले आहे की, देशात जी व्यक्ती घटनेच्या विरोधात काम करेल त्यास पद्मश्री देऊन गौरविण्यात येणार, जगाचा पोशिंदा शेतकरी यास तालिबानी ठरवणार, मात्र येणाऱ्या पाच राज्यातील निवडणुका डोळ्यांसमोर ठेवत कृषीचे काळे कायदे मागे घेतल्याने हा खऱ्या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचा विजय असल्याचे त्यांनी नमूद केले. याठिकाणी जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी तालुक्यातील परिस्थिती विशद करताना बहुतांश जमीन शासनाने विविध प्रकल्पात संपादन केली असल्याने औद्योगिक वसाहत असूनही वाढती बेरोजगारी प्रमुख समस्या बनली आहे. त्यामुळे सरकार स्तरावर प्रयत्न व्हावेत असा आशावाद व्यक्त केला.
कार्यक्रम स्थळी महसूलमंत्री यांच्यासमवेत इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर, प्रदेश उपाध्यक्ष राजाराम पांनगव्हाणे, शहराध्यक्ष शरद आहेर, प्रदेश सचिव भास्कर गुंजाळ, तालुकाध्यक्ष रामदास धांडे,अँड. संदीप गुळवे, महिला अध्यक्षा मनीषा मालुंजकर, इगतपुरी शहराध्यक्षा सविता पंडित, माजी सभापती गोपाळा लहांगे हजर होते. या कार्यक्रमास काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब कुकडे, माजी तालुकाध्यक्ष उत्तमराव भोसले, सरपंच रोहिदास कातोरे, जिल्हा चिटणीस देवराम नाठे, डॉ. अमृत सोनवणे, कार्याध्यक्ष अरुण गायकर, पर्यावरण सेल अध्यक्ष निवृत्ती कातोरे, सुदाम भोर, जी. पी. चव्हाण,रामदास मालुंजकर, माजी सरपंच रमेश जाधव, ग्रा. पं. सदस्य गोविंद डगळे, विजय काशिनाथ भोर, नंदराज गुळवे, संपत काळे, पांडुरंग शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.