सलगच्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान : जाचक अटी रद्द करून विमा कंपनीने शेतकऱ्यांना विम्याची रक्कम न दिल्यास आंदोलन ; बाळासाहेब आमले यांचा इशारा

प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज, दि. १८

इगतपुरी तालुक्यात कालपासून सलग दोन दिवसांच्या अवकाळी पावसाने शेतात कापलेल्या भाताचे प्रचंड नुकसान झाले आहे. कापणी केलेल्या भाताला मोड फुटले आहेत. शासनाने दखल घेऊन शेतकऱ्यांचा सरसकट पीकविमा मंजुर करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी भाजपाचे तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब आमले यांनी केली आहे. इगतपुरी तालुक्यातील खरीप हंगामातील मुख्य असणाऱ्या भात पिकावर दरवर्षीप्रमाणे यंदाही पुन्हा अस्मानी व सुल्तानी संकट आले आहे. आधीच मावा, तुडतुडे व करपा या रोगांनी भातपिकाचे नुकसान झाले असतांना उरल्या सुरल्या भातपिकाची सोंगणी शेतकऱ्यांनी सुरू केली. त्याचे पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

इगतपुरी तालुक्यातील शेतकरी खरीप हंगामातील भातपिकाच्या विम्यापोटी लाखो रुपये भरून विमा काढत असतो. मात्र भारती एक्सा कंपनी जाचक अटी लावुन शेतकऱ्यांना विम्याची रक्कम देण्याचे टाळत आहे. यावर कुणीही ठोस भूमिका घेत नाही. मागील वर्षी विम्याची रक्कम मिळाली नसतांना शेतकऱ्यांनी यंदाही विमा भरला. पुन्हा बेमोसमी पावसाने भातपिकाचे नुकसान झाले. शासनाने याची दखल घेऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. विमा कंपनीने शेतकऱ्यांचा विमा मंजूर न केल्यास आंदोलन छेडण्यात येईल.

- बाळासाहेब आमले, भाजपा तालुका उपाध्यक्ष

ऐन सोंगणीतच पावसाच्या हजेरीने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. गेल्यावर्षी शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होऊनही अद्यापही पिकविम्याची रक्कम मिळाली नाही. यावर एकही लोकप्रतिनिधींनी अद्याप कोणताही आवाज उठवला नाही. यंदाही तीच परिस्थिती उदभवल्याने शेतकऱ्यांची पुरती वाट लागली आहे. दोन दिवस सलग बेमोसमी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने भात पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. विमा कंपनी मात्र शेतकऱ्यांना विम्याची रक्कम टाळण्यासाठी जाचक अटी लावुन जबाबदारी झटकत आहे. यावर लोकप्रतिनिधी आवाज उठवत नसुन शासनाने शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करावे. भरपाई देण्यासह ज्या शेतकऱ्यांनी पीकविमे काढले असतील अशा शेतकऱ्यांना यंदा तरी पीकविम्याची नुकसानीपोटी रक्कम द्यावी अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशारा भारतीय जनता पार्टीचे इगतपुरी तालुका उपाध्यक्ष तथा पाडळी देशमुखचे उपसरपंच बाळासाहेब आमले यांनी दिला आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!