इगतपुरीनामा न्यूज, दि. १५
मुंबई आग्रा महामार्गावरील एका हॉटेलजवळ झालेल्या अपघातात इगतपुरी तालुक्यातील टाकेघोटी येथील १६ वर्षीय युवक ठार झाला आहे. आज सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान अज्ञात वाहनाने धडक दिल्याने हा अपघात झाला. ह्या अपघातात अजून १ युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहे. अपघात झाल्याचे समजताच रुग्णमित्र नंदू जाधव यांनी तत्परतेने जखमींना अत्यावश्यक उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. ह्या अपघातात प्रदीप चंद्रकांत भगत वय १६ रा. टाके घोटी हा युवक ठार झाला. तर विनायक खंडू भगत वय २४ रा. टाके घोटी ह्या युवकाला जास्त मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला. इगतपुरी तालुक्यात विविध ठिकाणी अपघातांचे सत्र सुरूच असल्याचे ह्या अपघातातून दिसून येत आहे. हे रोखण्यासाठी घोटी टोल प्रशासनाने सूक्ष्म अभ्यास करून आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरत आहे.