३ बालिका आणि १ युवकाच्या अपघातातील बळीप्रकरणी खंबाळे ते घोटी उड्डाणपुलाच्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : आक्रमक शिवसेना आणि आगरी सेना पदाधिकाऱ्यांचे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन

संबंधित अपघातग्रस्तांच्या कुटुंबाला तात्काळ नुकसानभरपाई देण्याची मागणी

इगतपुरीनामा न्यूज, दि. ८

मुंबई आग्रा महामार्गावरील खंबाळे ते घोटी उड्डाणपुलाचे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्यामुळे ह्या परिसरात अपघातांचे सत्र वाढले आहे. ह्या कामातील ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे आज मुंढेगाव येथील ३ बालिका आणि एका युवकाचा बळी गेला आहे. यामुळे अजून किती बळी जाण्याची वाट पाहणार आहोत ? असा सवाल इगतपुरी तालुक्यातील शिवसेना आणि आगरी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. अपघाताला कारणीभूत ठरलेल्या उड्डाणपूल ठेकेदारावर तातडीने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, संबंधित अपघातग्रस्त व्यक्तींच्या गरीब कुटुंबाला आर्थिक नुकसानभरपाई द्यावी यासाठी शिवसेना आणि आगरी सेना आक्रमक झाली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले आणि घोटी पोलीस ठाण्यात आज याबाबत पदाधिकाऱ्यांनी निवेदन देऊन न्याय देण्याची मागणी केली. मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात करण्यात आला आहे. यापुढील प्रत्येक अपघाताला ठेकेदाराला जबाबदार धरावे असेही निवेदनात नमूद आहे.

निवेदन देतेवेळी शिवसेना तालुकाप्रमुख भगवान आडोळे, पंचायत समितीचे उपसभापती विठ्ठल लंगडे, आगरी सेनेचे प्रदेश नेते सुरेश गणपत कडू, आगरी सेना युवा जिल्हाध्यक्ष अनिल भोपे, जेष्ठ नेते रघुनाथ तोकडे, नंदलाल भागडे नगरसेवक संपत डावखर, कैलास कडू, धनराज म्हसणे, सिद्धेश्वर आडोळे, राजू गतीर, जनार्दन कडू, नामदेव तांगडे, एकनाथ म्हसणे, सुनील गतीर, किशोर गतीर आदी उपस्थित होते.

आज सायंकाळी तुषार हरी कडू वय 24, पायल ज्ञानेश्वर गतीर वय 11, विशाखा ज्ञानेश्वर गतीर वय 8 रा. मुंढेगाव, ईश्वरी हिरामण डावखर वय 10 रा. गिरणारे ता. इगतपुरी हे घोटीजवळ अपघातात ठार झाले. या पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुका शिवसेना आणि आगरी सेनेने आक्रमक भूमिका घेतली. उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांना निवेदन दिले. ह्या घटनेचा वस्तुनिष्ठ तपास करून संबंधित कारणीभूत असणाऱ्या व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी याबाबत चर्चा केली. ह्या अपघाताला खंबाळे ते घोटी उड्डाणपुलाचे धीम्या गतीने सुरू असलेले काम कारणीभूत असल्याने संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, संबंधित कुटुंबांना आर्थिक नुकसानभरपाई द्यावी. अन्यथा आक्रमक आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात नमूद आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!